शक्तीमिल सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी पुन्हा जेरबंद; स्वत:ची टोळी बनवून दहशत पसरविण्याचा केला प्रयत्न

मुंबई : मुंबईत गाजलेल्या शक्तीमिल सामुहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगार आकाश जाधव याला पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. स्वत:ची वेगळी गँग तयार करुन दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

शक्तीमिल प्रकरणातील तत्कालीन अल्पवयीन गुन्हेगार आकाश श्रीधर जाधव हा आता २५ वर्षाचा झाला आहे. त्याने स्वत:ची गँग बनवून परिसरात दहशत पसरवली होती. दोघांची हत्या केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. याशिवाय धमकावणे, गंभीर दुखापत करणे, मारहाण करणे, खंडणी गोळा करणे असे अनेक गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. तुरुंगातून सुटका झाल्यानंतरही त्याने हे गंभीर गुन्हे केले आहेत. शक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरणात तो अल्पवयीन असल्याने न्यायालयाने त्याला कठोर शिक्षा न देता काही दिवस तुरुंगात ठेवल्यानंतर जामीनावर त्याची सुटका केली होती.

Advt.

आकाश जाधव हा पूर्वी अग्नीपाडा येथे रहात होता. सध्या तो डोंबिवली येथे रहायला गेला आहे. ब्रांदा पोलीस ठाण्यात एकाच्या डोक्यावर व हातावर चाकूने वार करुन त्याला गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील आरोपी अंकीत अरुण नाईक (वय २५) हा डोंबिवलीला पळून गेला असून त्याच्याविरुद्ध अनेक खुन, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार डोंबिवली पोलिसांनी अंकीत नाईक याला पकडले. त्यातून शक्तीमिल बलात्कार प्रकरणातील आरोपी आकाश जाधव याने गँग तयार केल्याची माहिती पुढे आली. आकाश जाधव याच्याविरुद्ध खुन, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, हाणामारी असे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत.

शक्ती मिल बलात्कार प्रकरण
मुंबईतील शक्ती मिल या ठिकाणी २२ ऑगस्ट २०१३ रोजी एका महिला वृत्तछायाचित्रकारावर ६ जणांनी सामुहिक बलात्कार केला होता. या बलात्कार प्रकरणात न्यायालयाने ३ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. तर एकाला आजीवन कारावासाची शिक्षा दिली आहे. याप्रकरणात आणखी दोन अल्पवयीन मुले होती. या दोन्ही अल्पवयीन मुलांना ३ वर्षांसाठी बालसुधार कारागृहात पाठविण्यात आले होते. या अल्पवयीन गुन्हेगारांमध्ये आकाश जाधव याचा समावेश होता. ३ वर्षाची शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतरही त्याने गुन्हेगारी विश्व सोडले नाही. आता तर त्याने स्वत:ची गँग तयार केली आहे.