दुहेरी हत्याकांडातील आरोपी MPSC ची परीक्षा देऊन कारागृहाकडे रवाना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – केडगाव दुहेरी हत्याकांडातील शार्प शूटर संदीप गुंजाळ याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा आज नगरला येऊन दिली. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात त्याला नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहकडे रवाना करण्यात आले आहे.

केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी संदीप गुंजाळ याने नाशिक मध्यवर्ती कारागृहात असताना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा फॉर्म भरला होता. परीक्षा देण्यास परवानगी देण्यात यावी, यासाठी त्याने जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने त्याला परीक्षा देण्याची मुभा दिली होती. कोतवाली पोलिसांनी बंदोबस्तात त्याला परीक्षा केंद्रावर आणून पुन्हा नाशिक मध्यवर्ती कारागृहात जमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानुसार शनिवारी रात्री पोलिसांचे पथक संदीप गुंजाळ याला घेऊन नगरकडे निघाले होते.

गुंजाळ याचे परीक्षा केंद्र रूपीबाई बोरा न्यू इंग्लिश स्कूल होते. पोलिसांनी सकाळी त्याला परीक्षा केंद्रावर आणले. परीक्षा झाल्यानंतर बंदोबस्तात नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहकडे रवाना केले. सायंकाळी पाच वाजता ही परीक्षा संपली. त्यानंतर त्याला रवाना केले आहे.