रेमडेसिवीरचा काळा बाजार करणारा आरोपी पोलिसांच्या तावडीतून पसार; माणुसकी आली पोलिसांच्या अंगाशी, रोजा सोडण्याच्या बहाण्याने पलायन

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणार्‍या एक आरोपी पाचपावली पोलीस ठाण्यातून पसार झाला आहे. उबेद रजा इकराम उल हक असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही. पाचपावली येथील मुख्य गुरुद्वाराजवळ अपोलो मेडिकल स्टोअर्स आहे. तेथून तो ५० हजार रुपयांना दोन इंजेक्शन विकत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून त्याला रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर त्याला इंजेक्शन उपलब्ध करुन देणारा दुसरा आरोपी अहमद हुसेन जुल्फिकार हुसेन यालाही पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी दिली होती.

मंगळवारी सकाळी पाच पावली पोलीस ठाण्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखुची विक्री करणार्‍या आरोपींवर कारवाई सुरु होती. तसेच दुसर्‍याही काही गुन्ह्यातील आरोपी पोलीस ठाण्यात असल्याने गर्दी झाली होती. सायंकाळी उबेद रजा याने रोजा सोडण्याच्या बहाण्याने पोलिसांनी हात तोंड धुण्यासाठी कोठडी बाहेर काढण्याची विनंती केली. माणुसकीखातर एका पोलिसाने त्याला कोठडीबाहेर काढले. हात तोंड धुतल्यावर उबेद हा ठाण्याच्या आवारात बसला.

नमाज पठन करत असल्याचा बहाणा केला. हे पाहिल्यावर त्याला कोठडीबाहेर काढणारा पोलीस दुसर्‍या आरोपीची चौकशी करु लागला. आपल्याकडे त्याचे लक्ष नसल्याचे पाहून उबेद याने संधी सांधून पोलीस ठाण्यातून पळ काढला. काही वेळाने तो पळून गेल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. संपूर्ण शहरात त्याचा शोध घेतला जात आहे.