पुण्यातील ‘या’ कोविड सेंटरमध्ये बसवलेले 30 TV तब्बल 10 हजार रूपये अधिक दराने खरेदी केल्याचा आरोप, ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेच्या सणस स्पोर्ट्स हॉस्टेल येथील कोविड सेन्टर मध्ये बसवण्यात आलेले 30 टेलिव्हिजन तब्बल 10 हजार रुपये अधिक दराने खरेदी केले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक महेंद्र पठारे यांनी केली आहे.

पठारे यांनी सांगितले, की महापालिकेच्या विद्युत विभागाने सणस स्पोर्ट हॉस्टेल येथील कोविड सेन्टर मध्ये 32 इंचाचे 30 एलईडी टीव्ही बसवले आहेत. एका संचाची किंमत 25 हजार असून 30 संचासाठी किम्मत 7 लाख 56 हजार इतकी रक्कम देण्यात आली आहे. प्रत्यक्षात ज्या कंपनीचे हे टीव्ही आहेत त्या टीव्हीची खुल्या बाजारात 14 हजार 999 इतकी किंमत आहे. असे असताना विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही खातरजमा न करता 17 एप्रिल ला ही खरेदी केली आहे.

प्रत्येक टीव्ही साठी 10 हजार याप्रमाणे 3 लाख रुपये अधिक मोजण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा मुळे आणि 67 ( 3) अंतर्गत दिलेल्या अधिकारांचे अधिकाऱ्यांनी उल्लंघन केले आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. महापालिकेला फसवणाऱ्या संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही महेंद्र पठारे यांनी केली आहे.

बाजारभावा पेक्षा खरेदी करण्यात आलेल्या टीव्ही चे दर अधिक असल्याचे लक्षात आले आहे. मुळातच टीव्ही संचाचा पालिकेचा डीएसआर रेट 25 हजार आहे. संबंधित पुरावठादाराने 5 टक्के कमी दराने संच पुरवण्याची तयारी दर्शवली होती, त्यानुसार पुरवठा केला आहे. परंतु त्याचे बिल अद्याप दिलेले नाही. बाजारभावा नुसारच बिल अदा करण्यात येईल. याप्रकरणी चौकशी करण्यात येईल.

श्रीनिवास कंदुल, शहर अभियंता, विद्युत विभाग, पुणे महापालिका