छेडछाड करणार्‍या आरोपीनं बांधून घ्यावी पिडीतेकडून राखी, इंदौर हायकोर्टाचा आदेश

इंदूर : वृत्तसंस्था – रक्षाबंधन सण देशभर साजरा केला जातो. दरम्यान मध्य प्रदेशातून एक असे प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये इंदूर उच्च न्यायालयाने अनोख्या अटीवर विनयभंगाच्या आरोपीला जामिनावर सोडले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, आरोपी रक्षाबंधनाला पीडितेच्या घरी जाऊन राखी बांधून घेईल आणि रक्षण करण्याचे आश्वासनही देईल.

हे संपूर्ण प्रकरण उज्जैनमधील खाचरोड जवळील आहे ,जेथे आरोपीवर एप्रिल महिन्यात रात्री दोनच्या सुमारास आपल्या शेजारी राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून विनयभंगाचा आरोप होता. उज्जैन जिल्ह्यातील भटपचलना पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवल्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले व खाचरोड कोर्टात हजर केले होते. यानंतर खाचरोड कोर्टाने आरोपीला तुरूंगात पाठवले होते. आरोपीने जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता, जो रद्दबातल झाला. नंतर आरोपीने इंदूर उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती आणि हायकोर्टाचे न्यायमूर्ती रोहित आर्य यांच्या सिंगल बेंचने हा आदेश दिला.

रक्षाबंधनाला त्या महिलेकडून राखी बांधून तिला संरक्षण देण्याचे आश्वासन देण्याच्या आणि नुकसान भरपाई म्हणून पीडितेच्या ताटात ११००० ठेवणार, या अटीवर खंडपीठाने आरोपीला तुरूंगातून सोडले. एवढेच नाही तर त्या महिलेच्या मुलाला भेट म्हणून 5000 रुपये देईल.रक्षाबंधनाला आरोपी सकाळी ११ वाजता आरोपीच्या घरी जाऊन राखी बांधून आपला फोटो कोर्टासमोर सादर करेल. याच अटीवर इंदूर उच्च न्यायालयाच्या सिंगल बेंचने आरोपीला जामिनावर सोडले आहे. आम्ही जामिनासाठी याचिका दाखल केली असल्याचे आरोपीच्या वकिलाने सांगितले. कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. अटीमध्ये आरोपी राखी बांधून महिलेला संरक्षण देण्याचे आश्वासन देईल आणि नुकसान भरपाई म्हणून ११००० तिच्या ताटात ठेवेल. तसेच महिलेच्या मुलाला भेट म्हणून ५००० रुपये देईल.