दोन लहान मुलींवर बलात्कार प्रकरणात आरोपीला आजन्म जन्मठेप

नांदेड/भोकर : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड)- हिमायतनगर येथील फुलेनगर भागात 8 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी भोकर न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 16 मार्च 2019 रोजी ही घटना घडली होती. विषेष म्हणजे आरोपीला अशाच एका घटनेत यापूर्वीच न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. हिमायतनगर फुलेनगर येथे 16 मार्च 2019 रोजी आरोपी बालाजी मल्हारी देवकाते (वय-43) याने ऑटोमध्ये खेळत असलेल्या आठ वर्षीय मुलीस आमिष दाखवून बाजूला मोकळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

आरोपी बालीजी देवकते हा सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास एका 8 वर्षीय चिमुकलीला घेऊन जात होता. त्यावेळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी देवकते याला हटकले. त्यावेळी त्याने मुलगीच माझ्या मागे येत असल्याचे सांगून तिला शेतात घेऊन गेला. त्याने या ठिकाणी मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात देवकते विरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलगी घराकडे रडत येत असताना फिर्यादी व इतर लोकांनी पीडित बालिकेस विचारणा केली असता, तिने बालाजी देवकते याने तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले.

या गुन्ह्यात सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले, तपासण्यात आलेल्या साक्षीदारांच्या व पीडित मुलींच्या जबाबावरून भोकरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. शेख यांनी आरोपीस जन्मठेप व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यामध्ये दोषी ठरवत आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा तसेच 5 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. रमेश राजूरकर यांनी बाजू मांडली. पोलीस उपनिरीक्षक डी.एस. काळे यांनी तपास केला. तर काकडे यांनी पैरवी अधिकारी म्हणून मदत केली.

बाललैंगिक अत्याचाराचे दोन गुन्हे
आरोपी बालाजी देवकते याच्याविरोधात हिमायतनगर पोलीस ठाण्यात बालैंगिक अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्यातील पहिल्या खटल्यात भोकर न्यायालयाने देवकते याला मरेपर्यंत जन्मठेप आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर मंगळवारी झालेल्या दुसऱ्या खटल्याच्या सुनावणीत आरोपी देवकते याला मरेपर्यंत जन्मठेप आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/