अमरावती : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास 20 वर्षे कारावास

परतवाडा (अमरावती) : पोलीसनामा ऑनलाइन – नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकणी अचलपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक १ ए. ए. सईद यांच्या न्यायालयाने एकास २० वर्षे कारावास व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विजय मनोहर जवंजाळ (रा. रावळगाव, ता.अचलपूर) असे त्याचे नाव आहे.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, ८ मार्च २०१९ रोजी सकाळी ९ च्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी खेळण्यास गेली असता, गावातील समाजमंदिरावळ आरोपी विजय याने पीडिताला तिळाचा लाडू देण्याची बतावणी करून समाजमंदिरात नेऊन बलात्कार केला. आसेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. उपविभागीय अधिकारी तथा तपासी अधिकारी ए. पी. पालवे यांनी तपास करून अचलपूर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.ए.सईद यांच्या न्यायालयासमोर झाली. सहायक सरकारी वकील डी. ए.नवले यांनी एकूण ८ साक्षीदार तपासले. पीडितेचा जबाब, वैद्यकीय अधिकारी रश्मी तिखे व डॉ.पी.एच.अळने यांची साक्ष ग्राहय धरून न्यायाधीश ए.ए.सईद यांनी विजय जवंजाळ याला भादंविचे कलम ३७६ (अ)(ब) व ६ बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्याप्रमाणे २० वर्षे सक्तमजुरीची व २० हजार रुपये दंड ठोठावला. तसेच दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त शिक्षा ठोठावली. तसेच पीडिताला नुकसान भरपाईचा आदेश दिला.