बलात्कार प्रकरण : लातूर जिल्हा न्यायालयाने आरोपीस सुनावली 10 वर्षे सक्तमजुरी

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यामधील दापक्याळ येथील एका पीडित महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणी लातूरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरी, 10 हजार रुपये दंड आणि 6 महिने सक्तमजुरी व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावलीय.

दापक्याळ येथील पीडित महिलेच्या पतीचा मित्र मोहन बाबुराव कासले हा नेहमीच पीडितेकडे वाईट नजरेने बघत होता. याबाबत पीडितेने तिच्या पतीस ही बाब सांगितली होती. परंतु, तिच्या पतीने तो माझा मित्र आहे असे समजून दुर्लक्ष केले. दरम्यान, 4 ऑगस्ट 2018 रोजी रात्री 9.30 वाजता शेतात पाणी देण्यासाठी पीडितेचा पती तसेच त्याचा मित्र मोहन कासले गेले होते. त्या दोघांच्या जेवणाचा डबा घेऊन पत्नीही शेतात पोहोचली होती.

लाईट गेल्याने पीडितेचा पती मोटार चालू करण्यासाठी गेला असता, आरोपीने पाठीमागून येऊन पीडितेवर अत्याचार केला. प्रतिकार आणि आरडाओरड केल्यानंतर पीडितेचा पती धावत आल्याचे पाहून आरोपीने पळ काढला. याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात कलम 376, 323 भादंविनुसार गुन्हा दाखल झाला होता.

त्यानंतर तपासाअंती दोषारोपपत्र दाखल झाले. सरकार पक्षाच्या वतीने एकूण 5 साक्षीदार तपासले. या प्रकरणात पीडिता, पीडितेचा पती यांची साक्ष व वैद्यकीय अहवाल ग्राह्य धरून लातूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश एस. तिवारी यांनी आरोपी मोहन बाबुराव कासले यास 10 वर्षे सक्तमजुरी, 10 हजार रुपयांचा दंड, 6 महिने सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे, असे सहायक सरकारी वकील व्ही.व्ही. देशपांडे यांनी सांगितले आहे.

या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक शैलेश बंकवाड यांनी केला. तर, सरकार पक्षाच्या वतीने ड.व्ही.व्ही. देशपांडे यांनी काम पाहिले आहे. त्यांना अ‍ॅड. वैशाली वीरकर यांनी साह्य केले असून महिला पोलीस नाईक सुमन हाळे यांनी पैरवीचे कामकाज पाहिले आहे.