Thane News : खूनी हल्ल्यासाठी अग्निशस्त्र पुरविणाऱ्या आरोपीला अटक, 7 पिस्तुले हस्तगत

ठाणे: पोलीसनामा ऑनलाईन – एका खूनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या एकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने रविवारी (दि. 14) अटक केली. त्याच्याकडून सात माऊजर पिस्टल, दोन मॅगझीन आणि 20 जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.

कैलाससिंग चावला (27, रा. गांधवानी, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला 19 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलाससिंग हा गावठी बनावटीच्या माऊजर पिस्टल तस्करीसाठी ठाण्यातील साकेत येथील महालक्ष्मी मंदिराच्याजवळ येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, निरीक्षक कृष्णा कोकणी, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल जाधव, संदीप चव्हाण आणि उपनिरीक्षक दत्तात्रय सरक आदींच्या पथकाने रविवारी (दि. 14) पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास पिस्टल विक्रीसाठी आलेल्या कैलाससिंगला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची झडती घेतली असता त्यात माऊजर पिस्टलसह एक लाख 88 हजार 750 रुपयांची शस्त्रसामुग्री हस्तगत केली. त्याच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सखोल चौकशीत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एक वर्षांपूर्वी दाखल असलेल्या एका खूनाच्या प्रयत्नातील गुन्हयातील आरोपीला त्याने पिस्टल पुरविल्याचे उघड झाले. यात तो गेल्या अनेक दिवसांपासून वॉन्टेड होता. त्याला विठ्ठलवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.