भाजपा सोडताच 10 महिन्यांपूर्वीच्या प्रकारावरुन उमेदवारावर FIR

अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या वर्षी ८ डिसेंबर रोजी अंबरनाथ येथील कार्यक्रमात रामदास आठवले यांना प्रवीण गोसावी याने धक्काबुक्की आणि मारहाण केली होती. त्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजक अजय जाधव आणि सुमेध भवार यांनी गोसावी याला मारहाण केली होती. तेव्हा सुमेध भवार हे भाजपात होते. त्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मनसेत प्रवेश केला. त्यांना मनसेने अंबरनाथमधून तिकीट दिले. त्यानंतर आता १० महिन्यांनी प्रवीण गोसावी यांच्या अर्जावरुन पोलिसांनी सुमेध भवार यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

अंबरनाथ विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तरुण चेहरा म्हणून सुमेध भवार यांना पुढे करण्यात आले होते. भवार यांना उमेदवारी मिळावी यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते त्यातील एका कार्यक्रमात रामदास आठवले यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आले होते. नेताजी मैदानावर ८ डिसेंबर २०१८ रोजी एका कार्यक्रमात मार्गदर्शन केल्यानंतर आठवले हे खाली उतरत असताना पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्याने गोसावी याने आठवले यांच्या कानशिलात वाजवली होती. त्यानंतर गोसावी यांना मारहाण झाली होती. याप्रकारानंतर गोसावी यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, गोसावी यांना मारहाण केल्याप्रकरणी आजवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

सध्या भवार हे भाजपा सोडून मनसेत दाखल झाले आहेत. ते मनसेचे उमेदवारही आहेत. आता गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामदास आठवले यांना भेटण्यासाठी जात असताना अजय जाधव यांनी मारहाण करुन जखमी केले. त्यावेळी सुमेध भवार यांनी देखील दगडाने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. जाधव आणि भवार यांच्याविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Visit : Policenama.com