राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून भाजपाकडून ‘या’ 3 दिग्गजांची नावे निश्चित !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी माजी राज्यमंत्री फौजिया खान आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर भाजपकडून ही उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजप कडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले, एकनाथ खडसे आणि उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कमोर्तब झाल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यसभेत ५५ जागांसाठी २६ मार्चला निवडणूक होत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे. या जागांवरील सध्याच्या सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. राज्यातील भाजप नेतृत्वाने उदयनराजे भोसलेंना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरु आहे. तसेच, भाजपात नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनाही राज्यसभेत पाठविण्याची तयारी भाजपाने सुरू केली आहे. त्याचबरोबर रामदास आठवलेंची खासदारकी कायम ठेवण्यात येणार आहे. तर राष्ट्रवादीकडून शरद पवार, माजिद मेमन निवृत्त होत आहेत. त्यामुळे, मेमन यांच्याऐवजी फौजिया खान यांना संधी देण्याचे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने निश्चित केल्याचे समजले आहे.

भाजपात प्रवेश केल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पोटनिवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना हा करावा लागला. एकनाथ खडसेंनी जाहीरपणे राज्य नेतृत्वाखाली आपली नाराजी बोलून दाखवली होती. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचं भाजपकडून समाधान करण्यात येत आहे.