धक्कादायक ! प्रेयसीने केला प्रियकरावर ‘अ‍ॅसिड’ हल्ला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – प्रेमदान चौकातील एका हॉटेलमध्ये तरुणावर अ‍ॅसिडसारखे ज्वालागृही रसायन फेकल्याप्रकरणी जखमी युवकाच्या प्रेयसीला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियकर आमीर शेख इतर मुलींशी मैत्री करून आपली फसवणूक करतो, या रागातून प्रेयसीनेच त्याच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला.

अंजूम शेख (रा. नारायणडोह, ता. नगर) हिला अटक केली आहे. ‘क्राईम पेट्रोल’ ही मालिका पाहून अ‍ॅसिड हल्ला करायला शिकले, अशी कबुलीही तिने दिली आहे. सोमवारी प्रेमदान चौकातील तोरणा हॉटेलमध्ये प्रेयसीची वाट पाहत असलेल्या आमीर रशिद शेखवर (वय २५, रा. केरूळ, आष्टी, जि. बीड) अ‍ॅसिडसारखे ज्वालागृही रसायन फेकले गेले होते. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर आमीरची प्रेयसी अंजूम शेख (रा. नारायणडोह, नगर) हिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशी करून तिला सोडून देण्यात आले होते; परंतु हॉटेल सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज व इतर माहितीवरून अंजूमनेच हा हल्ला केल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलिस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार सांगळे, दत्तात्रय जपे, मंगेश खरमाळे यांच्या पथकाने अंजूमला नारायणडोह येथून पुन्हा तपासासाठी ताब्यात घेतले. त्यावेळी तिने गुन्हा कबूल केला आहे.