पुण्यात धुळवडीच्या उत्सवाला गालबोट ! 8 वर्षाच्या बालकावर रंगाऐवजी टाकलं ‘अ‍ॅसिड’, चिमुरडा ‘गंभीर’

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मंगळवारी पुण्यात धुळवडीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, पिंपरी चिंचवडमध्ये या उत्सवाला गालबोट लागलं आहे. रंग खेळताना आठ वर्षाच्या चिमुरड्यावर अ‍ॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये चिमुरडा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना सांगवी परिसरात मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी अकरा वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल करून सांगवी पोलीस त्याच्याकडे चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धुलवडीच्या दिवशी सर्वत्र रंग खेळत असताना चिमुरड्यावर अ‍ॅसिड फेकल्याने गंभीर जखमी झाला आहे. रंगाचा बेरंग करणाऱ्या या घटनेमुळे सांगवी परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार पालकांच्या लक्षात येताच त्याला उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वेळीच उपचार मिळाल्याने पुढील अनर्थ टळला असल्याचे औंध रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

सांगवी परिसरात राहणारे दोन लहान मुले मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास धुळवडी निमित्त रंग खेळत होते. हे दोघे जण एकमेकांच्या अंगावर रंग उडवत होते. त्याचवेळी आठ वर्षाच्या मुलाच्या अंगावर दुसऱ्या मुलाने रंग समजून पांढऱ्या रंगाच्या बाटलीतील अ‍ॅसिड फेकले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. हा प्रकार मुलाच्या आई-वडिलांना समजताच त्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दखल केले.

मुले ज्या ठिकाणी रंग खेळत होते त्या ठिकाणी घरातील फरशी पुसण्याचे रंगीत अ‍ॅसिड आणून ठेवले होते. खेळता खेळता मुलांपैकी एकाने अ‍ॅसिड असलेली बटली उचलली आणि दुसऱ्या मुलाच्या अंगावर भिरकावली. त्यामुळे बाटलीतील अ‍ॅसिड मुलाच्या अंगावर उडाले. यात तो गंभीर भाजला आहे. या प्रकरणी जखमी मुलाच्या वडिलांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरु आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून तपासानंतर हा प्रकार कसा घडला हे समजेल.