Pimpri News : बनावट ओळखपत्राद्वारे फसवणूक करणारा तोतया सहाय्यक पोलीस आयुक्त ताब्यात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवून हुल देण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया पोलीस अधिकाऱ्याला निगडी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन चिखली पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई मंगळवारी (दि.2) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जाधव सरकार चौक कुदळवाडी येथे करण्यात आली.

प्रविण लक्ष्मण सुर्यवंशी (वय-33 रा. मल्हारपेठ, ता. कराड, जि. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या तोतया पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी वाहतुक पोलीस सुनिल शिवाजी गायकवाड (वय-40) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

fake-id

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी वाहतूक शाखेचे पोलीस कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत होते. मंगळवारी सायंकाळी होंडा झॅज कार (एमएच 50 एल 2216) मधून आरोपी प्रवीण सुर्यवंशी आला. तो स्वत: अंधेरी वेस्ट, मुंबई येथे सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असल्याचे फिर्यादी यांना सांगितले. तसेच त्याने बनावट ओळखपत्र दाखवले. ओळखपत्रावर असलेल्या फोटोमध्ये फोटोतील व्यक्तीच्या खांद्यावर राजमुद्रा व स्टार असल्याचे दिसत असल्याने ओळखपत्र बनावट असल्याची शंका पोलिसांना आली. त्याला कुदळवाडी चौकीत आणून सखोल चौकशी केली असता त्याने आपण पोलीस अधिकारी नसल्याची कबुली दिली. तसेच ओळखपत्र टोल नाक्यावर दाखवून त्याने शासनाची फसवणूक केल्याचे चौकशीत समोर आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त सुधिर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, पोलीस निरीक्षक बाळासाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस.एस. राऊत, पोलीस नाईक गायकवाड, दहिफळे, कशाळे, कोल्हे यांच्या पथकाने केली.