Pune News : कोंढव्यातील बलात्कार प्रकरणात शिक्षकाची निर्दोष मुक्तता, क्लासमधील विद्यार्थीनीने केला होता बलात्काराचा आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   मर्चंट नेव्हीच्या कोर्सचा खर्च करतो, असे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला मित्राच्या फ्लॅटवर नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप 18 वर्षीय पीडित मुलीने केला होता. याप्रकरणात मोसिन इलाही शेख (वय 32, रा. कौसरबाग, कोंढवा खुर्द) या शिक्षकाची सह प्रथमवर्ग, न्यायदंडाधिकारी लष्कर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. पीडित तरुणीने हे प्रकरण यापुढे न्यायालयात चालवायचे नसल्याचे सांगितल्याने शेख यांची न्यायाधिश ए.एस. देशपांडे यांनी निर्दोष मुक्तता केली.

पीडित तरुणीने बलात्कार केल्याचा आरोप करुन मोसिन शेख यांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी मोसिन शेख याच्यावर 376, 506 नुसार गुन्हा दाखल केला होता. मात्र फिर्यादी तरुणीला हे प्रकरण यापुढे न्यायालयात चालवायचे नसल्याचे तसेच आपण मोसिन शेख यांच्याविरूध्द खोटी तक्रार केल्याचे सांगितल्याने न्यायालयाने 5 जानेवारी 2021 मध्ये मोसिन शेख यांची निर्दोष मुक्तता केली. यानंतर कोंढवा पोलिसांनी मोसिन शेख याचे पोलिस रेकॉर्डवरील नाव कमी करावे यावे यासाठी मोसिन शेख यांचे वडिल इलाही शेख यांनी परिमंडळ 5 कार्यालयात अर्ज केला होता.

त्यानुसार परिमंडळ 5 कार्यालयाने कोंढवा पोलिस ठाण्याला मोसिन शेख यांचे नाव पोलीस रेकॉर्डवरून कमी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. हे प्रकरण फिर्यादी यांना पुढे चालवायचे नसल्याने सदर प्रकरण ‘ब वर्ग’ समरी मंजूर करुन या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे क्राईम रजिस्टर व पोलीस निरीक्षक संगणक विभाग, एम.ओ.बी गुन्हे शाखा, पुणे शहर, विशेष शाखा (पडताळणी विभाग) यांनी त्यांच्या कडील अभिलेखावर मोसिन शेख यांना निर्दोष मुक्त केल्याची नोंद करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील यांनी दिले आहेत.