भारतावर पुन्हा हल्ला झाल्यास पडेल महागात, अमेरिकेची पाकला धमकी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास पाकिस्तानसमोर मोठ्या अडचणी निर्माण होतील, अशी तंबी अमेरिकेने पाकिस्तानला दिली आहे. पाकिस्तानात सक्रिय असलेल्या जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटनांवर पाकिस्तान कारवाई करतो की नाही हे पाहणे गरजेचे आहे. आपल्या क्षेत्रात पुन्हा तणावाची स्थिती निर्माण होऊ नये असे पाकिस्तानला वाटत असेल, तर त्याला पुन्हा कारवाई ही करावीच लागेल असे ट्रम्प प्रशासनातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने व्हाइट हाऊसमध्ये बोलताना सांगितले.

आणखी बरेच काही करणे गरजेचे

गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानने दहशतवादी संघटनांविरोधात काही प्राथमिक पावले उचलल्याचे दिसत आहे. यात पाकिस्तानने काही दहशतवादी संघटनांच्या संपत्ती जप्त करण्याच्या कारवाया केल्या आहेत. शिवाय काहींना अटकही केले आहे. याबरोबरच जैशची काही ठिकाणेही पाकने आपल्या ताब्यात घेतली आहेत. मात्र, या व्यतिरिक्त पाकिस्तानने आणखी बरेच काही करणे गरजेचे आहे, असेही अधिकारी म्हणाले .

मसूद अजहर खुलेआम

यावेळी बोलताना अधिकारी म्हणाले, “पाकिस्तानने घाईघाईत केलेली दहशतवाद्यांविरोधातील कारवाई अपुरी आहे. काही लोकांना अटक केली जाते, मात्र नंतर त्यांना सोडण्यात येते हे आपण यापूर्वी पाहिले आहे, असे म्हणत अधिकाऱ्याने जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिझ सईद आणि जैशचा मसूद अजहर खुलेआम फिरत असल्याकडे निर्देश केला आहे. इतकेच नाही तर या म्होरक्यांना देशभरात खुलेआम फिरण्याची आणि देशभर सभा घेण्याची मुभा देण्याकडेही अधिकाऱ्याने लक्ष वेधले. पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई करावी ही अमेरिकेची अपेक्षा आहे. अमेरिका आपल्या आंतरराष्ट्रीय सहकारी देशांना सोबत घेत दहशतवादाच्या प्रश्नावर पाकिस्तानवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही अधिकारी म्हणाला.