डमी आडत्यांवरील जोरदार कारवाईने आडत्यांचे धाबे दणाणले

आडत्यांनी केली अधिकचे कर्मचारी ठेवण्यास परवानगीची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे बाजार समितीने बाजार समितीच्या आवारातील डमी आडत्यांवर जोरदार कारवाई केल्याने आडत्यांचे धाबे दणाणले आहेत. व्यवसायाचे बदलते स्वरूप आणि शेतीमालाच्या विक्रीची गरज म्हणून आडत्याना अधिकचे कर्मचारी ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आडते असोसिएशनने केली आहे. त्यामुळे २००७ च्या नियमानुसार पुढील महिनाभर प्रत्येक गाळ्यावर एक आडते आणि दोन सहाय्यक अशीच रचना राहील. महिनाभर अभ्यास करून याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

देशमुख यांनी सांगितले, की मार्केटयार्ड मधील गाळ्यांवर नियमापेक्षा अधिक आडते किरकोळ व्यापार करत असल्याचा तक्रारी होत्या. १८ तारखेपासून मार्केटयार्डमध्ये विशेष मोहीम राबवून २३० आडत्यांवर कारवाई केली. यामध्ये तरकारी विभागातील १२६ तर फळ विभागातील १०७ आडत्यांचा यामध्ये समावेश असुन ४ लाख ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

या कारवाईनंतर मार्केटयार्डमधील ३०० ते ४०० आडत्यानी बाजाराची गरज आणि बदलत्या व्यवसायाचे स्वरूप याची वस्तुस्थिती मांडली. यावेळी पणन संचालकही उपस्थित होते. पणन संचालकांनीही सध्याची बाजाराची गरज, करावे लागणारे बदल याचा अभ्यास आणि प्रत्यक्ष निरीक्षण करून निर्णय घ्यावा, अशी सूचना केली. त्यानुसार पुढील महिनाभर २००७च्या नियमानुसार एक आडत आणि दोन मदतनीस अशी तीन व्यक्तींनाच परवानगी देण्यात येईल. पुढील महिनाभर बाजारातील प्रत्येक बाजार घटकाचा अभ्यास करण्यात येईल. त्यानंतर सर्वांना विश्वासात घेऊन निश्चितपणे सर्वसमावेशक निर्णय घेण्यात येईल.

याबाबत आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले की, मार्केटयार्ड मधील होलसेल खरेदी विक्री दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. वाहतूक खर्च वाढत असल्याने उत्पादक आणि विक्रेते स्थानिक बाजारांकडे वळत आहेत. त्यामुळे याठिकाणी येणारा नाशवंत असललेला भाजीपाला लवकरात लवकर विक्री व्हावा यासाठी मादतनीसांची गरज वाढली आहे. याचा बाजार समितीने विचार करावा, अशी आमची मागणी आहे.