कोंढव्यातील ‘गगन एमरड’ सोसायटीतील ‘बेकायदा’ नळकनेक्शनवर कारवाई

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – कोंढव्यातील गगन एमरड सोसायटीने घेतलेल्या बेकायदा नळ कनेक्शनवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. येथील बेकायदा नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत.

लष्कर पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता तपन चिकणे आणि कनिष्ठ अभियंता शरयु टिकले व त्यांच्या सहका-यांनी विश्वस्तांचा विरोध असताना कठोरपणे कारवाई करुन नळ कनेक्शन तोडण्यात आले.

गेल्या महिन्यात शरयु टिकले यांनी या बेकायदा नळ कनेक्शनची पाहणी केली होती. त्यावेळी गगन एमरड सोसायटीच्या विश्वस्तांनी त्याला विरोध केला होता. त्यानंतर अनिक सुंडके यांनी महापालिकेला पत्र देऊन बेकायदा नळ कनेक्शनवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात सोमवारी ही कारवाई करण्यात आली.

यावेळी ३ अधिकारी व २५ पोलीस कर्मचारी यांच्या बंदोबस्तात मनपाचे ३ अधिकारी, १२ कर्मचारी यांनी हे एक इंची १० नळ कनेक्शन तोडले. यावेळी विरोध करणा-या विश्वस्तांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

दरम्यान, ही कारवाई होत असल्याचे समजताच माजी आमदार महादेव बाबर, साईनाथ बाबर हे तेथे आले होते. त्यांनी कोणाच्या परवानगीने ही कारवाई केली अशी विचारणा अधिका-यांकडे केली. तेव्हा अधिका-यांनी आमच्याकडे आलेल्या तक्रारीवरुन ही कारवाई केली. त्यानंतर त्यांनी याप्रमाणे कोंढव्यातील सर्व बेकायदा नळ कनेक्शनवर कारवाई करा असे अधिका-यांना सांगितले. महापालिका अधिका-यांनी तक्रार न दिल्याने शेवटी विरोध करणाऱ्यानां सोडून देण्यात आले.