पुण्यातील पॉश परिसरातील हॉटेलवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी शहर पोलिस आणि महापालिकेने संयुक्तरित्या सुरू केलेल्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. दोन्ही विभागाने रहदारीस अडथळा ठरणार्‍या अतिक्रमणांवर कारवाई करण्यास सुरूवात केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

विशेषत: कोरेगाव पार्क, बाणेर सारख्या पॉश परिसरात रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या हॉटेल्सची अतिक्रमणे कारवाईच्या रडारवर आली आहेत. प्रामुख्याने इमारतीची साईड मार्जीन, ग्रंट मार्जीनमध्ये हॉटेल थाटून रस्त्यावरील बेकायदा पार्कींगला चालना देवून वाहतुकीला अडथळा आणणार्‍या हॉटेल्सवरील कारवाईला चांगलीच धार आली आहे. कोरेगाव पार्क परिसरातील अशा ५० हून अधिक तसेच बाणेर, बालेवाडी परिसरात टेरेसवर बेकायदा सुरू असलेल्या हॉटेल्सवर बांधकाम विभागाने धडक कारवाई सुरू केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

शहराचा कोरेगाव पार्क, कॅम्प आणि अलिकडे आयटी सेक्टरमुळे प्रकाश झोतात आलेल्या चांदणी चौक, बाणेर, बालेवाडी परिसरातील हॉटेल व्यावसायाला अच्छे दिन आले आहेत. अत्यंत पॉश एरियामध्ये असलेल्या ही हॉटेल्स विकेन्डला अक्षरश: गर्दीने ओसंडून जातात. या परिसरातील रिअल इस्टेटचे दरही महागडे असल्याने अतिक्रमण करून उच्च वर्गाच्या नाईटलाईङ्गसाठी येथील रस्ते रात्री उशिरापर्यंत जागे असतात. नगररोडहून शहरात येणारी अनेक वाहने कल्याणीनगर , कोरेगाव पार्कमार्गे शहरात येतात. त्यामुळे अहोरात्र येथील रस्ते गर्दीने फुललेले असतात.

अशातच अनेक हॉटेल्स चालकांनी पार्किंगच्या जागेत विशेषत: इमारतींच्या साईड आणि ङ्ग्रंट मार्जीनमध्ये ग्राहकांना बसण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे त्यांची वाहने रस्त्यावर लावली जातात. अगोदरच रहादारी वाढलेल्या या रस्त्यांवर बेकायदा पार्कींग होत असल्याने वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे.

महापालिका आयुक्त सौरभ राव आणि पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी आयुक्तपदाचा कार्यभार घेतल्यानंतर शहरातील वाहतूकीच्या प्रश्‍नावर संयुक्त उपक्रम सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या व्यावसायांमागील कारणे शोधून त्यावर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. साधारण महिन्याभरापुर्वी झालेल्या बैठकीमध्ये दोन्ही विभागांकडून वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या व्यावसायीकांच्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या. त्यानुसार महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे.

कोरेगाव पार्क येथील ५० हून अधिक हॉटेल्सला नोटीस पाठवून अतिक्रमण काढण्यात आले आहे. तसेच बाणेर येथील इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेल्या हॉटेल्सवरही अशीच कारवाई करण्यात आली आहे. या हॉटेल व्यावसायीकांनी पुन्हा अतिक्रमण केल्याचे आढळल्यास हॉटेल मालक आणि संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा महापालिका आणि पोलिसांच्यावतीने देण्यात आला आहे.

या हॉटेलवर होणार कारवाई

प्रेम रेस्टॉरंट (नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क), हॉटेल आथर थीम रेस्टॉरंट (लेन नं.६ कोरेगांव पार्क), हॉटेल पब्लिक (लेन नं. ७ कोरेगाव पार्क), हॉटेल ग्रँइमामाज (कोरेगाव पार्क), हॉटेल एफिन्गुट (लेन नं. ६, कोरेगाव पार्क), हॉटेल डेली ऑल डे (कोरेगाव पार्क), रोटी शोटी कॅफे (वृंदावन बिल्डींग, कोरेगाव पार्क), पिड पंजाब हॉटेल (विमल कुंज अपार्टमेंट, कोरेगाव पार्क), महेश लंच होम (पुणे स्टेशन)

You might also like