बारामती शहर पोलिसांची अक्षय जाधव टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई

बारामती :  पोलीसनामा ऑनलाइन – बारामती शहरातील व्यपाऱ्यांकडून जबरदस्तीने खंडणी उकळणाऱ्या आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या अक्षय टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये एका परप्रांतीयासह सहा जणांचा समावेश आहे. या टोळीवर खुन, खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे, घरफोडी, जबरी चोरी, खंडणी अशा स्वरुपाचे २४ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी मागील आठवड्यात अशाच प्रकारची कारवाई केली होती. मोक्काअंतर्गत झालेली ही आठवड्यातील दुसरी कारवाई आहे. आत्तापर्यंत ३१ जणांवर कारवाई करण्यात आली असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुर्वी फिर्यादी आकाश उर्फ मोज्या हनुमंत वाघमोडे (वय २४,धंदा  व्यापार,रा.वडकेनगर,आमराई ,बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.वाघमोडे हे शहरातील पानगल्लीमध्ये सफरचंद विक्रीचा व्यवसाय करतात.नेहमीप्रमाणे सफरचंद विकुन झाल्यावर पॅकींग करीत होते. यावेळी दोन दुचाकीवर अक्षय उर्फ आकाश उर्फ भोºया बापुराव जाधव (वय २३, रा.मळद,ता.बारामती), पोक्या उर्फ  शंकर प्रकाश आडके , शिवराम बबन आडके उर्फ गुड्डया उर्फ करण वर्मा (वय २७,मुळ रा.राजगी,जि.नालंदा, राज्य बिहार,सध्या रा.मळद,ता. बारामती), सनी रोहिदास भंडलगर (वय२६,रा.मळद,ता. बारामती), पोक्या आडकेचा साथीदार (फरारी), पोक्या आडकेचा साथीदार (फरारी) यांनी चार हजार रुपये हफ्ता दे म्हणुन फियार्दीच्या गळ्याला चाकु लावला. सफरचंद विक्रीचे ४७०० रुपये, अर्धा तोळे वजनाची १२५०० रुपये किंमतीची अंगठी, ८६० रुपये किंमतीचे घड्याळ हिसकावुन घेतल्याचा प्रकार घडला.

या ६ आरोपींवर विविध गंभीर २४ गुन्हे दाखल आहेत.त्यानुसार या गुन्ह्यातील आरोपी अक्षय उर्फ आकाश याने आर्थिक प्राप्ती तसेच टोळीच्या वर्चस्वासाठी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी अपर पोलीस अधिक्षक डॉ संदीप पखाले यांनी कोल्हापुर परीक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे प्रकरण पाठविले  होते. त्याला मंजुरी देण्यात आली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ करत आहेत.

मागील दहा दिवसांत बारामती शहर पोलीस स्टेशन, बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन एकुण ३१ जणांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटीलयांनी १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहिर केल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.