Nashik News : लाचखोर तलाठी ACB च्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – सातबारा उताऱ्यावर वारसांची नावे लावण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेताना शिवडे (ता. सिन्नर) येथील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. सोमवारी (दि. 22) ही कारवाई करण्यात आली.

हरीश लासमन्ना ऐटवार असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवडे येथील तक्रारदाराच्या आजोबांचे निधन झाले असून, त्यांचे वारस म्हणून तक्रारदाराची आई व मामाच्या नावांची सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी तलाठी ऐटवार यांनी तक्रारदाराकडे 2 हजाराची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने नाशिकच्या एसीबी कार्यालयाकडे तक्रार दिली होती.

त्यानुसार, सोमवारी (दि. 22) लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचला. त्यावेळी तलाठी ऐटवार याने 2 हजारांची तडजोड करून 1 हजार 500 रुपयांची रक्कम पंच व साक्षीदाऱ्यांच्या समक्ष सिन्नर येथील संगमनेर नाक्यावरील लकी टी स्टॉलजवळ स्वीकारताना पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे.