Mumbai : विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नका अन्यथा कारवाई; महापालिका शिक्षण विभागाचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधितची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय पथकाने तर राज्यात कोरोनाची दुसरी लाट असल्याचे सांगितले आहे. त्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लादले आहेत. दरम्यान दहावी, बारावीच्या परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षांशिवाय महापालिकेकडून अधिकृत निर्देश येत नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नये, अशा सूचना पालिका शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आल्या आहेत. या नियमाचे उल्लंघन केल्यास अशा शाळा, संस्थांवर व सदर मुख्याध्यापकांवर कारवाई होईल, असे पालिका शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भवामुळे मुंबईत अद्याप शाळा सुरू करण्यास कोणत्याच बोर्डांना परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, राज्य बोर्डाच्या तसेच इतर बोर्डाच्या नियोजित आणि जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार परीक्षांसाठी महानगरपालिका शिक्षण विभागाकडून परवानगी देण्यात आलेली आहे. काही दिवसापासून राज्यात सर्वत्र बाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. मुंबईतही याचे प्रमाण वाढू लागले आहे. ऑनलाईन शिक्षण देण्याचा सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र काही शाळा, संस्था पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनासाठी पेपर सबमिट करणे, अकॅडेमिक ऍक्टिव्हिटीज् करणे आदींसाठी शाळेत बोलवत आहेत. यासंदर्भात पालकांनी थेट पालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींवर हा गंभीर प्रकार असल्याचे मत महापालिका शिक्षण विभागाने नोंदवत सर्व बोर्डांच्या शाळांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.

दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिकांबाबत संभ्रम
सध्या दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिकांबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने अनेक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे प्रात्यक्षिके होणार कि नाही तसेच ती कधी होणार याबाबत स्पष्टता नाही. दुसरीकडे शिक्षण विभागाने शाळांना सद्य:स्थितीत प्रात्यक्षिके घेण्यास शक्य नसल्यास लेखी परीक्षेनंतरही शाळा प्रात्यक्षिकांचे आयोजन करू शकतील, अशी मुभा दिली आहे. मात्र, शिक्षण विभागाने यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करणे अपेक्षित असल्याचे म्हणणे शाळांनी मांडले.