Pune : मामा-भाचे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरात दोन दिवसामध्ये दोन विविध ठिकाणी खुनी हल्ला करून रोकड लंपास करणाऱ्या मामा आणि भाचेच्या संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली. तर हे दोन गुन्हे एकूण ९ आरोपींनी केल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. यावरून गौरव फडणीस (३० रा. पर्वती दर्शन), अक्षय गरुड (२० रा. व्ही.आय.टी. कॉलेजच्या मागे, अपर इंदिरानगर, सचिन पांडुरंग सोंडकर (३१ रा.अपर इंदिरानगर, बिबवेवाडी), महादेव सुरेश नंदुरे (२० दत्तनगर, कात्रज), चिराग संजय देशमुख (रा. खोपडेनगर, कात्रज) यांना अटक केली आहे.

अधिक माहितीनुसार, ३ एप्रिलला रात्री १० च्या दरम्यान, पुणे सातारा रोडवरील अरण्येश्वर कॉर्नर येथील व्ही. आर. गुप्ता, देशी दारूचे दुकान, सुप्रील इंडस्ट्रीयल इस्टेट येथे ६ व्यक्तींनी दुकानात घुसून दुकानाचे मॅनेजर आणि कामगाराला रिव्हॉल्वरचा धाक दाखवत पालघनने आणि दारू मोजण्याच्या लोखंडी मापाने मारहाण केलीय. तर त्यांच्याकडून ५७ हजार रुपये जबरदस्तीने पळून नेले. या प्रकरणावरून दुकानाचे मॅनेजर (रा. बावधन, मुळशी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, ४ एप्रिलला रात्री 7 च्या दरम्यान स्वारगेटच्या लक्ष्मीनारायण थिएटर समोर ब्रिजखाली एका ५० वर्षीय वृत्तपत्र विक्रेत्याला चाकूने धाक दाखवून त्यांच्याकडील पेपर विक्रीचे जमलेले एकूण ९० हजार ३०० रुपये असलेली बॅग अनोळखी व्यक्तींनी हिसकावून पळवून नेली होती. या प्रकरणावरून दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला होता.

पोलिसांनी अधिक तपास केला असता, आरोपी ऋषिकेश उर्फ हुक्या श्रीकांत गाडे (रा. व्ही.आय.टी. कॉलेजच्या मागे,अपर इंदिरानगर,बिबवेवाडी, पुणे) याच्या नेतृत्वाखाली संघटीत टोळी बनली आहे. त्याच्यासह त्याच्या टोळीने पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण अशा विविध ठिकाणी अनेक गुन्हे केल्याचे उघड झालं आहे. तर या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा टाकणे, दरोड्याचा प्रयत्न, घरफोडी, गंभीर दुखापती,अग्निशस्त्रे, घातक शस्त्रे घेऊन दहशत माजविणे यांसारखे अनेक गुन्हे केल्याची विविध पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. तसेच आरोपी गाडे याने स्वतः ५७ गुन्हे केल्याची कबुली दिली,  एकूण ६६ गुन्हे केल्याची नोंद पोलिसांना सापडली आहे. या सर्व आरोपीवर दत्तवाडी पोलिस ठाणे आणि वारजे पोलीस स्टेशनमध्येही गुन्ह्याची नोंद आहे.

या दरम्यान, टोळीचा म्होरक्या गाडे याने टोळीचे वर्चस्व आणि दहशत कायम ठेवण्याच्या उद्देश्याने संघटीत गुन्हेगारी कृत्य वारंवार सुरु ठेवले. तसेच या टोळीने बेकायदेशीर मार्गाने आर्थिक आणि अन्य फायदा मिळविण्यासाठी असे गुन्हे केले आहेत. या सर्व प्रकरणामूळे सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद गंभीरे यांच्याकडून या गुन्ह्याला मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे सादर करण्यात आला. यावरून अपर पोलीस आयुक्त शिंदे यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली. त्यानुसार वरील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. याचा अधिक अधिक तपास स्वारगेट विभाग सहा. पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण करीत आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यापुर्वी शहरात संघटित गुन्हेगारी करणार्‍या तब्बल 21 हून अधिक टोळयांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.