अवैध वाहतूक करणाऱ्या ११२ रिक्षांवर कारवाई

हडपसर : पोलीसनामा ऑनलाईन – हडपसर परिसरात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हडपसर पोलीस आणि हडपसर वाहतूक शाखेने संयुक्तरित्या आज कारवाई केली. हडपसर परिसरातील अवैध प्रवासी वाहतूक व अतिक्रमण यामुळे वाहन चालकांना वाहन चलवणे अवघड होते. यातून छोटे-मोठे अपघात होत आहेत.

यामुळे पोलिसांनी अडथळा निर्माण करणाऱ्या रिक्षांवर आज (सोमवार) मोठी कारवाई केली. या कारवाईत ११२ रिक्षा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. मुदतबाह्य रिक्षा स्क्रॅप करण्याचा प्रस्ताव आरटिओकडे देण्यात येणार असल्याचे हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी सांगितले.

हडपसर पोलीस आणि वाहतूक पोलीस यांनी आज गंगानगर, फुरसुंगी, तुकाईदर्शन, गाडीतळ, मांजरी, महादेवनगर या परिसरातील अवैध प्रवासी रिक्षांवर कारवाई केली. यामध्ये ११२ रिक्षा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. रिक्षाचालकाला परमिट नसणे, ड्रायव्हिंग लायसन्स नसणे, अवैध प्रवासी वाहतूक, वाहतुकीस अडथळा ठरेल अशा पद्धतीने रिक्षा थांबविणे या कारणांमुळे  रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई हडपसर पोलिस ठाण्यातील ६ अधिकारी व २४ कर्मचारी यांनी केली आहे.

या कारवाईचे हडपसर ग्रामस्थांनी स्वागतच केले आहे.वाहतूक पोलिसांनी वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या या रिक्षांवर कारवाई करावी. पादचारी मार्गावरील अतिक्रमण करणाऱ्या पथारी विक्रेत्यांवर महानगरपालिकेनी कारवाई करावी.भविष्यात अवैध प्रवासी बस वाहतुकीवरही कारवाई करण्यात यावी.कारवाई मध्ये सातत्य नसल्यामुळे येथील वाहतूक व्यवस्था मोडकळीस आलेली आहे.