रामबागेतील कुख्यात लंकेश मेश्रामच्या मटका अड्ड्यावर छापा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – रामबागमधील कुख्यात लंकेश मेश्राम याच्या मटका अड्ड्यावर नागपूर पोलिसांनी मंगळवारी रात्री आठच्या सुमारास छापा टाकला. परिमंडल चारचे पोलीस उपायुक्त निलेश भरणे यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात सहा जणांना अटक करून रोख रक्कम दुचाकींसह सव्वा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. निशांत दिनेश शंभरकर (वय ३९, रा. रामबाग), प्रदीप रामचंद्र उमरे (वय ५०, रा. चंद्रमणीनगर), राजा धनराज मांजरे (वय ४०, रा. राजाबाक्षा वसाहतीजवळ), सतीश गुरुदेव गाणार (वय ४२, रा. उंटखाना), पृथ्वीराज एकनाथ तागडे (वय ५४, रा. अजनी) आणि राजेश राजू गुप्ता (वय ५४, नंदनवन) यांना यावेळी पकडण्यात आले.

मागील अनेक वर्षांपासून कुख्यात मेश्राम याचा पेशुमल धर्मशाळेजवळ मटक्याचा अड्डा सुरु होता. याची माहिती पोलीस उपायुक्त भरणे यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली इनामवाडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार एम. एम. साळुंके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अड्ड्यावर छापा टाकला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळुंके यांनी मंगळवारीच ठाण्याचा पदभार घेतला. त्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. मात्र छापा पडणार अशी कुणकुण लागताच मेश्राम पसार झाला. त्याच्यावर यापुर्वी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. तरीही त्याच्यावर काहीच परिणाम झालेला नाही. या छाप्यात लंकेश मेश्राम मात्र पसार झाला. पकडण्यात आलेल्यांच्या विरोधात जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यांच्याकडून १४,१२० रुपये, दोन मोटरसायकली, पाच मोबाईलसह १ लाख, १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.