इंदापुरातील अवैध कत्तलखान्यावर कारवाई; 10 लाख 30 हजारांच्या मुद्देमालासह तीन आरोपींना अटक

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  नगर परिषद हद्दीतील कुरेशी गल्ली येथे बेकायदेशीरपणे चालविण्यात येत असलेल्या जनावरांच्या कत्तलखान्यावर इंदापूर पोलीस पथकाकडून टाकण्यात आलेल्या छाप्यात कतलीसाठी आणलेल्या ७ जिवंत जर्सी गायी, तसेच ३० जर्सी गायींची नर जातीची लहान वासरे (अंतुले), एक महिंद्रा पिकअप, एक आयशर टेम्पो, दोन बोलेरो पिकअप, एक पल्सर व ७०० किलो जर्शी गायींचे कापलेले मांस यासह एकूण १० लाख ३० हजारांच्या मुद्देमालासह तीन आरोपींना इंदापूर पोलिसांनी अटक केली. आरोपींना इंदापूर न्यायालयात हजर केले असता, चार दिवस पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

याबाबतची फिर्याद महिला पोलीस उपनिरीक्षक सीमा सुरेश मुंढे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी (दि. ४ डिसेंबर २०२०) रात्री साडेदहाच्या सुमारास गुप्त खबर्‍यामार्फत मिळालेल्या माहितीवरून इंदापूर शहरातील कुरेशी गल्ली येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर इंदापूर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, सहायक पोलीस निरीक्षक बिरोबा लातुरे, महिला पोलीस उपनिरीक्षक सीमा मुंढे यांच्यासह पोलीस पथकाने छापा टाकला. वरीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करून जिवंत जनावरांची सुटका करून तीन आरोपींवर कारवाई करण्यात आली.

आक्रम रशिद कुरेशी (वय १९), आलीम खय्युम कुरेशी (वय ३२) व तोफीक निस्सार मुलाणी (वय २८, सर्व रा. कुरेशी गल्ली, इंदापूर, जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी रात्री सिमेंट विटांनी अर्धवट बांधलेल्या बांधकामात बेकायदेशीर अर्धवट कापलेली जनावरे, कातडी व मुंडके व मांस तसेच ७ जिवंत जर्सी गायी तसेच ३० जर्सी गायींची नर जातींची लहान वासरे कत्तलखान्यात अन्नपाण्याविना क्रूरतेने डांबून ठेवलेल्या स्थितीत आढळून आली, तर वरील तीन आरोपी हे त्या ठिकाणी निष्पाप जनावरांच्या कतली करत असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत ७ जर्सी गायी किंमत ७० हजार रुपये, काळ्या पांढ-या रंगांची ३० जर्सी गायींची नर जातींची वासरे (अंतुले) किंमत ३० हजार, एक पांढ-या रंगाचा महिंद्रा पिकअप (क्र. एमएच ४२, एलटी ६५७४) किंमत २ लाख, एक विटकरी रंगाचा आयशर टेम्पो (क्र. एमएच ४२, बी ७५२७) किंमत ३ लाख, एक पांढ-या रंगाची बोलेरो पिकअप (क्र. एमएच ४२, एम. ४६२९) किंमत २ लाख, एक पांढ-या रंगाची बोलेरो पिकअप (क्र. एमएच ४८, टी ८६९६) किंमत २ लाख व जर्सी गायी तसेच वासरांचे अर्धवट कापलेले मांस ७०० किलो, असा एकूण १० लाख, ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व माल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, जनावरांचे मांस व कातडी हे नाशवंत असल्याने पशुवैद्यकीय अधिकारी यांनी जागेवर येऊन वैद्यकीय तपासणीसाठी मांस सॅम्पल घेतले व उर्वरित मांस व कातडी नष्ट करण्यात आली असल्याची माहीती इंदापूर पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक बिरोबा लातुरू करत आहेत.