कोठला येथील कत्तलखान्यावर छापा 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – कोठला परिसरातील बापूसाहेब मशिदीच्या पाठीमागे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकून पोलिसांनी 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने कारवाई केली.
मुस्तकील जानमीया कुरेशी व त्याचे ३-४ साथीदार यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, कुठला परिसरातील बापूसाहेब मशिदीच्या पाठीमागे कत्तलखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यावरून पोलिसांच्या विशेष पथकाने कोठला परिसरात छापा टाकून कत्तलीसाठी आणलेली लहान जनावरे, मांस व इतर साहित्य असे एकूण 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोठला परिसरात यापूर्वीही अनेकदा कारवाई करून कत्तलखान्यावर कारवाई केली होती. तरीही पुन्हा कत्तलखाने सुरू झाले आहेत.
पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे, सपोनि रविंद्र पिंगळे यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी, तोफखाना व कोतवाली पोलिस ठाण्यातील कर्मचारी आदींनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी दत्तात्रय कोतकर यांच्या फिर्यादीवरून कुरेशी व इतरांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सुधारितचे कलम ५ (क)९ (अ) सह भारतीय प्राणी संरक्षण अधिनियम १९६० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.