अवैध धंदे बंद न झाल्यास पोलिसांवर कारवाई

मिरज :पोलीसनामा ऑनलाईन

पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंदे सुरु असतील तर ते बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून , अवैध सुरु असल्याचे आढळल्यास पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असून यासंबंधीच्या तशा नोटीसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

अवैध धंदे हे बंदच राहतील. ते जर सुरू असतील तर त्या पोलिस ठाण्याला जबाबदार धरण्यात येणार आहे. अवैध धंदे सुरू असतील तर त्या बीटच्या पोलिसांवर कारवाई करण्यात येईल.

आगामी महापालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर गुन्हेगार व दंगलखोरांवरलक्ष ठेवले जात आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये महापालिका हद्दीतील 48 जणांना तडीपार करण्यात आलेअसून, अकरा जणांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. वेळ पडल्यास भविष्यात मोक्काही लावण्यात येणार आहे. आगामी निवडणूक ही शांततेतच पार पडेल, मिरजेतील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मिरजेतील सराफ पेढीतील पाच कोटी रूपयांच्या चोरीचा छडा लागलेला नाही. तो छडा लावण्यासाठी पोलिसांना आदेश देण्यात येतील, असेही अधीक्षक शर्मा म्हणाले.

अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपअधीक्षक धीरज पाटील, निरीक्षक सदाशिव शेलार, निरीक्षक मोहन जाधव यावेळी उपस्थित होते.