कुंजीरवाडी येथे 6 वाळूच्या ट्रकवर कारवाई, 51 लाख 68 हजाराचा मुद्देमाल जप्त

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यात होत असलेल्या बेसुमार अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी वचक बसविण्यासाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून यापैकी एक कारवाई पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी येथे करण्यात आली. यात सहा वाळू वाहतुक करणाऱ्या ट्रकसह एकविस ब्रास वाळू असा एकुण 51 लाख 68 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. यासर्व वाहनांवर पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासंदर्भात एक पथक तयार करण्यात आले. यानुसार पुणे-सोलापूर महामार्गावर अशाप्रकारची मोठी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावर लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक संदीप बोरकर, चमन शेख, पुणे ग्रामीणचे सलीम शेख यांना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कुंजीरवाडी येथे अशा प्रकारे अवैध वाळू वाहतुक करणारे सहा ट्रक आढळून आले. यामध्ये {(1) टाटा ट्रक नंबर एम एच 12, एच बी 9909, (2) टाटा ट्रक नंबर एम एच 12, सी टी 4667, (3) टाटा ट्रक नंबर एम एच 12, एफ सी 7843, (4) टाटा ट्रक नंबर एम एच 12, एच डी 6391, (5) टाटा हायवा ट्रक नंबर एम एच 42, टी 1679, (6) टाटा हायवा ट्रक नंबर एम एच 42, बी 7489} ही सहा वाहने एम आर एफ टायर शोरुम समोर उभी होती. यावेळी तेथे चालक अथवा मालक नसल्याने अज्ञात व्यक्तींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात ट्रक व वाळू असा एकुण 51 लाख 68 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्व वाहनांवर पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप बोरकर करीत आहेत.

Visit : policenama.com