वानवडी आणि मुंढव्यातील डिस्को थेकवर पोलिसांची धडक कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील वानवडी, मुंढवा परिसरातील विनापरवाना चालणाऱ्या आणि विनापरवाना मद्यविक्री करणाऱ्या डिस्कोथेक वर परिमंडळ ५ च्या पथकाने कारवाई करत मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच येथून डीजेचे साहित्य आणि विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे.

शहरातील परिमंडळ ५ मधील वानवडी तसेच मुंढवा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे सुरु असून ते पहाटेपर्यंत सुरु असतात. तसेच तेथे अवैधपणे मद्यविक्री करण्यात येते अशी माहिती परिमंडळ पाचच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर मिळालेल्य़ा माहितीनुसार डिस्कोथेकवर कारवाई केली.

वानवडीतील केपीसीटी मॉलमधील हॉटेल प्लाझो येथे पोलीस ११ मे रोजी मध्यरात्री पोलिसांनी छापा घातला. हॉटेलने पुणे शहर पोलीस आयुक्तांनी प्रसिध्द केलेल्या नोटीसीप्रमाणे कायद्यानुसार डान्सबार किंवा डिस्कोथेक साठी परवाना पोलिसांकडून घेणे गरजेचे आहे. परंतु हॉटेल प्लाझोने परवाना नसतानाही तेथे रात्री उशीरापर्यंत मोठ्या आवाजात डिजे वाजविले जात होते. तसेच येथे विनापरवाना मद्यविक्रीही करण्यात येत होती. दरम्यान याप्रकऱणी हॉटेलच्या मालकाविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

त्यासोबतच दिलीप शंकर भंडारी आणि मॅनेडर सनी राम मेवाती, डिजे चालक यांच्यावर ध्वनी पपर्यावरण संरक्षण कायदा १९८६ आणि ध्वनी प्रदुषण नियमन(नियमन व नियंत्रण) नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यासोबतच येथून ६४ हजार ७९६ रुपये किंमतीचे विदेशी मदय आणि डिजे जप्त करण्यात आले आहे.

तर मुंढव्यातील हॉटेल ब्लू शॉकवर १२ मे रोजी पोलिसांनी छापा घातला. त्यावेळी तेथे अवैधपणे रात्री उशीरापर्यंत विदेशी मद्य विक्री सुरु असल्याचे आढळून आले. त्यानंतर या हॉटेलचा मालक अविनाश प्रकाश कांबळे व कामगार सुहास हनुमंत साळुंखे या दोघांविरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणयात आला आहे. तर या हॉटेलमधून १३ हजार ३६३ रुपये किंमतीचे मद्य जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक बागूल, कर्मचारी धिमधिमे, उत्तेकर, कुंभार, जाधव, महिला पोलीस शिपाई मोरे, पाटील, पिसाळ, काकडे यांच्या पथकाने केली.