खा.सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर पोलिसांची कारवाई

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यातील गाड्यांमुळे वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी सोलापुरात पोलिसांनी कारवाई केली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचा सोलापूर दौरा सुरू आहे. या दौऱ्यात सुप्रिया सुळे विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधत आहे. संध्याकाळी सात वाजता सोलापुरातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात ‘संवाद ताईंशी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सुप्रिया सुळे या कार्यक्रमासाठी ज्या गाडीत आल्या होत्या. ती गाडी आणि त्यांच्यासोबत असलेल्या अनेक गाड्यांवर वाहुतकीला अडथळा केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. रहदारीच्या ठिकाणी या गाड्या थांबवल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीला अडथळा आला. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी हा प्रकार बघितल्यानंतर त्या गाड्या रस्त्यावरून हलवण्यास सांगितल्या.

परंतु, तरीही त्या गाड्या हलवण्यात आल्या नाहीत त्यामुळे पोलिसांनी तब्बल ८ गाड्यांवर कारवाई केली. मोटर वाहन कायद्यातील कलम १२२, १७७ नुसार ही कारवाई करण्यात आली. या गाड्यांमध्ये प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने नोंदणी असलेल्या गाडीचाही समावेश आहे.

या कारवाई वरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, रस्त्यावर होत असलेल्या अडथळ्यामुळे गाड्यांवर कारवाई केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली तर पोलिसांना पूर्व परवानगी दिली होती. तसेच हॉलच्या जवळ कुठेही पार्किंगची व्यवस्था नव्हती. परवानगी असताना ही जाणिवपूर्वक कारवाई करण्यात आली आहे.