Pune : सिंहगड रोड परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या ‘त्या’ टोळीवर ‘मोक्का’; CP अमिताभ गुप्तांकडून आतापर्यंत तब्बल 21 टोळयांवर MCOCA ची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आणखी एका गुन्हेगार टोळीला ‘मोक्का’चा दणका देत कारागृहात पाठवले आहे. सिंहगड परिसरात दहशत निर्माण करत असलेला रोशन लोखंडे व त्यांच्या साथीदारांवर मोक्का लावला आहे. तर आतापर्यंत शहरात 21 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कारवाई करत अनेकांना दणका दिला आहे. रोशन दयानंद लोखंडे (वय 21), प्रसाद अर्जुन धावडे (वय 20), वैभव अरुण तिडके (वय 21), पवन सुग्रीव बिराजदार (वय 24) आणि फैजल फिरोज काजी (वय 21) असे मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहे.

गेल्या महिन्यात (दि.15 फेब्रुवारी) रोशन लोखंडे व त्याच्या साथीदारांनी नर्हेत एका ऑफिसात घुसून कोयते चाकू, हॉकी स्टिक अशा हत्यारांचा धाक दाखवून जयंती साजरी करण्यासाठी रोख 10 हजार रुपये घेऊन गेले होते. शिवाय सिंहगड रस्ता परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना हत्यराचा धाक दाखवून दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान आरोपी सतत गुन्हे करत असल्याचे समोर आले. त्यांची गुन्हेगारी कृत्ये 2016 पासून सुरू आहेत. त्यांच्यावर मारहाण, अग्निशस्त्र बाळगणे, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. रोशन लोखंडेला दोन वेळा शहर व जिल्ह्यातील तडीपार करण्यात आले होते. तरीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मोक्कानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ निरीक्षक देविदास घेवारे यांनी उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार या प्रस्तावाची छाननी करण्यात आली. तसेच तो प्रस्ताव अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सादर केला. यानुसार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.