मावळमधील ‘चॉकलेट’ टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

कामशेत : पोलीसनामा ऑनलाइन –  खंडणी असे गंभीर गुन्हे करून मावळमध्ये दहशत पसरवणाऱ्या धनेश उर्फ चॉकलेट दिलीप शिंदे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

चॉकलेट टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्याकडे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला होता. त्यानुसार या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

धनेश उर्फ चॉकलेट दिलीप शिंदे (वय-३० रा. कामशेत गावठाण), डीग्या उर्फ रोशन बाळु शिंदे (वय-२०), सोन्या उर्फ प्रसाद तुकाराम शिंदे (वय-१९), श्रीधर श्रीकांत हुले, अक्षय प्रकाश वाघ (वय-२३), दिनेश दिपक शिंदे, शुभम हिराचंद गायकवाड (वय-२१) मनोज गमेश देशमुख (वय-२२), राजु ज्ञानेश्वर पठारे (सर्व रा. कामशेत) यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या टोळीने अनुराग गादीया यांचे पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण केले होते. तसेच सुटका करण्यासाठी १ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी या टोळीने दिली होती. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. उर्वरीत तीन आरोपींचा शोध घेत असताना टोळीचा म्होरक्या धनेश शिंदे याने दहीवली गावातील मंथन सातकर याचा गोळ्या झाडून खून केला. या गुन्ह्यामध्ये आरोपी धनेश शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे.

या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, विठ्ठल दबडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षिरसागर, पोलीस उपनिरीक्षक जीवन राजगुरु, सहायक पोलीस उप निरीक्षक विजय पाटील, दत्तात्रय जगताप, पोलीस हवालदार अजय दरेकर, प्रकाश वाघमारे, गणेश महाडीक, रऊत इनामदार, अक्षय जावळे, महेश गायकवाड, निलेश कदम, रवि शिंगारे, बाळासाहेब खडके यांच्या पथकाने केली.