आ. गोटेंच्या दुहेरी भूमिकेमुळे कार्यकर्ते संभ्रमात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – आमदार अनिल गोटे हे विरोधकांकडे युतीचा प्रस्ताव ठेवत असून दुसरीकडे आपल्याच पक्षातील नेत्यांना खडेबोल सुनावत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे ते भाजपात राहणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना आपण भाजपाचेच असल्याचे सांगून राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर त्यांनी टीकेची झोड उठविली आहे. यामुळे भाजपातील सामान्य कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

एकीकडे मंत्री गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली इतर पक्षातील कार्यकत्र्यांना भाजपात प्रवेश दिला जात आहे. तर कोऱ्या पाट्यांनाच उमेदवारी देणार असल्याचा आ. गोटेंनी नारा दिला आहे. आ. गोटे यांनी इच्छूकांच्या मुलाखती घेतल्यानंतर आता भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल हे स्वतंत्रपणे भाजपासाठी इच्छूकांच्या मुलाखती घेत आहेत. त्यामुळे भाजपाचे अधिकृत उमेदवार कोणाचे असतील? गिरीश महाजन गटाचे की आ. अनिल गोटे यांच्या गटाचे? मी भाजपाचाच म्हणणारे आ. गोटे पक्षासोबतच असतील तर त्यांनी उमेदवारीसाठी आतापर्यंत शोधलेल्या कोऱ्या पाट्यांचे काय होणार? आ. गोटे विकासासाठी कदमबांडेंशीही युती करायला तयार होतात तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्ष बिवाऱ्यालाही ठेवू नका, असे म्हणतात.

पालिका लुटणाऱ्यांना पुन्हा संधी देऊ नका, अशा कारस्थानाला मी पाठिंबा देऊ शकत नाही, असे आ. गोटे म्हणतात. दुसरीकडे पालिकेत सत्तेवर असणाऱ्या राष्ट्रवादीतले बहुसंख्य पदाधिकारी आता भाजपामध्ये आले आहेत. भाजपा आणि कमळ याशिवाय आपला दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे आ. गोटे म्हणत असतील आणि सत्ताधारी पक्षातून आलेल्यांनाच भाजपाने उमेदवारी दिल्यास आ. गोटेंची भूमिका काय असेल? याचीही उत्सुकता स्थानिकांना लागली आहे.