काही दिवसांपुर्वी लस घेऊन देखील आशुतोष राणा झाला कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   महाराष्ट्रात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. काल राज्यात संचारबंदीची घोषण झाली. देशपातळीवरही लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोनामुळे देशभरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशात सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनभोवतीच कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटींना गेल्या काही दिवसांत कोरोनाची लागण झाली. आता बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता आशुतोष राणा (Ashutosh Rana) यालाही कोरोनाची लागण झाली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच आशुतोषने कोरोना लसीचा पहिला डोज घेतला होता.

एक हसरा फोटो शेअर करत आशुतोषने स्वत: सोशल मीडियावर कोरोना झाल्याची माहिती दिली आहे, त्याने ही माहिती शेअर केली. या फोटोसोबत त्याने लिहिले, ‘आपले शरीर एका दुर्गासमान असते.यात नऊ द्वार असतात. याठिकाणी असलेली परमचेतना, रक्षण करणा-या शक्तीला दुर्गा म्हटले जाते. आज भारतीय नववर्षाची सुरूवात आहे. याला चैत्र नवरात्री असेही म्हटले जाते. आजपासून नऊ दिवस भारतात जगतजननी दुर्गेचे पूजन होते. या अत्यंत शुभदिनी तुम्हाला तुमच्या शरीरातील एका विकाराबद्दल माहिती मिळत असेल तर, यासारखे शुभ काहीही नाही. मला आजच कळले की, मी कोरोना पॉझिटीव्ह आहे. मी तत्काळ या आजारातून मुक्त होण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केलेत. मी लवकरच बरा होईल, असा विश्वास व्यक्त करतो,’ असे आशुतोषने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

गेल्या ६ एप्रिलला आशुतोषने पत्नी रेणुका शहाणेसोबत कोरोना लसीचा पहिला डोज घेतला होता. रेणुकाने तिच्या अधिकृत इन्स्टा अकाऊंटवर याची माहिती दिली होती. दरम्यान, आशुतोष राणाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. चाहत्यांनी राणा लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना सुरु केली आहे.