अभिनेते भारत गणेशपुरेंचा मोबाईल केला लंपास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम द्रुतगती मार्गावर पावसामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये ’चला हवा येऊ द्या’ फेम भारत गणेशपुरे यांचा फोन लंपास करण्यात आला आहे. फेसबुकवरून त्यांनी हा अनुभव शेअर केला आहे. एका टोळक्याने वाहतूक कोंडी दरम्यान त्यांचा फोन पळवल्याची माहिती त्यांनी दिली.

पश्चिम द्रुतगती मार्गावर कांदीवलीजवळ डोंगराचा भाग कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. याठिकाणी आधी काही गाड्या असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्यात धो धो कोसळणारा पाऊस होताच. याचाच फायदा घेत चोरट्यांनी फोन लंपास केला. हा व्हिडीओ शेअर करत भारत गणेशपुरे म्हणाले आहेत की, ’आज माझा मोबाइल अक्षरक्ष: लुटून नेला. ही घटना वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर कांदवलीजवळ घडली.

खूप पाऊस होता. काल दरड कोसळल्यामुळे खूप ट्रॅफिक होते.’ ही घटना नेमकी कशी घडली याची माहिती व्हिडीओतून दिली आहे. दोन माणसांनी वाहतूक कोंडीचा फायदा घेत त्यांना लुटल्याची माहिती गणेशपुरे यांनी दिली आहे. चाहत्यांना सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. गाडीमध्ये सेंटर लॉक असेल तर आधी गाडी लॉक करा. काच उघडू नका. तुम्हाला कुणी निर्दयी म्हटले तरी चालेल. माझा मोबाइल मुर्खपणामुळे या टोळीने लुटून नेला आहे.’