ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे 88 व्या वर्षी पुण्यात निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  ज्येष्ठ अभिनेते  आणि अनेक मराठी चित्रपटात पोलीस अधिकार्‍याची भूमिका गाजविणारे जयराम कुलकर्णी (वय ८८) यांचे पहाटे पुण्यात राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. आज मंगळवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

१९८० च्या दशकात जयराम कुलकर्णी यांना घेतले की चित्रपट हमखास हीट होतो, अशी त्यावेळी वंदता होती. अशोक सराफ, महेश कोठारी, सचिन पिळगांवकर यांच्याबरोबर त्यांनी अनेक भूमिका केल्या. माहेरची साडी, अशी ही बनवा बनवी, लेक चालली सासरला, धुमधडाका, गंमत जंमत, दे दणादण, नवरी मिळे           नवर्‍याला, झपाटलेला, बाळाचे बाप ब्रम्हचारी अशा अनेक चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.

मुळचे बार्शीचे राहणारे जयराम कुलकर्णी यांनी अनेक मराठी चित्रपटात चरित्र भूमिका केल्या आहेत. बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे हे जयराम कुलकर्णी यांचे मुळ गाव. गावात शिक्षणाची सोय नसतानाही त्यांना वाचन आणि अभिनयाची आवड निर्माण झाली़ शाळेत असताना त्यांनी मोरुची मावशी या नाटकात मावशीचे काम केले होते. तोच त्यांच्या आयुष्यातील रंगभूमीवरचा पहिला प्रवेश. शिक्षणासाठी ते पुण्यात स़ प़ महाविद्यालयात आले. तेथे त्यांनी श्रीकांत मोघे,शरद तळवळकर यांच्यासोबत पुलंच्या अंमलदार या नाटकात हणम्याची भूमिका केली होती.

खणखणीत ग्रामीण भाषा बोलणारा म्हणून जयराम कुलकर्णी यांच्यावर शिक्का बसला व त्यांना नाटकांमध्ये काम मिळायला सुरुवात झाली. आकाशवाणीमध्ये नोकरी करताना त्यांनी व्यंकटेश माडगूळकर यांचा सहायक म्हणून काम केले. बनगरवाडी कांदबरीच्या वाचनाचा कार्यक्रम ते करीत असत. गृहिणीं साठी लेखिका ज्योत्स्ना देवधर यांच्या माजघरातील गप्पा यातील त्यांची भूमिका गाजली होती.
१९७० मध्ये त्यांनी आकाशवाणीतील नोकरीचा राजीनामा दिला. पूर्ण वेळ अभिनयात स्वत:ला झोकून दिले. त्यांना दुर्ग भ्रमणाची आवड होती.

चित्रपटातील अभिनय आणि वाचनाची आवड होती. पुण्याहून मुंबई – कोल्हापूरला चित्रीकरणाला जाताना ते आपल्या वाचनाची आवड जोपासत होते. जयराम कुलकर्णी आणि डॉ. हेमा कुलकर्णी यांचा मुलगा रुचिर हा पेशाने वकील आहे. मृणाल देव -कुलकर्णी या जयराम कुलकर्णी यांच्या सून होत.