‘लॉकडाऊन’मध्ये काम नाही अन् कर्ज वाढल्यानं अभिनेता मनमीत ग्रेवालची आत्महत्या !

पोलिसनामा ऑनलाइन –चॅनल सब टीव्ही वरील शो आदत से मजबूर मध्ये काम केलेल्या अभिनेता मनमीत ग्रेवाल यानं शुक्रवारी (दि 15 मे) आत्महत्या केली आहे. 32 वर्षीय मनमीतन शुक्रवारी रात्री गळफास घेऊन जीवनयात्रा समाप्त केली. मनमीत पत्नीसोबत नवी मुंबईच्या खारघरमध्ये रहात होता. मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळं मनमीत खूप परेशान होता. लॉकडाऊनमुळं त्याच्या कमाईला पूर्णविराम लागला होता. यामुळंच तो डिप्रेशनमध्ये गेला होता.

एका वृत्तवाहिनीनं मनमीतचा जवळचा मित्र मनजीत सिंह राजपूत त्याच्या हवाल्यानं सांगितलं आहे की, गेल्या काही दिवसांपासून मनमीत आर्थिक अडचणीत होता. पर्सनल आणि प्रोफेशनल कामासाठी त्यानं लाखो रुपये उसने घेतले होते. कमाई नसल्यानं कोणतीही रक्कम त्याला चुकती करता येत नव्हती. लॉकडाऊनमध्ये याचा त्रास आणखी वाढल्यानं त्यानं हे पाऊल उचललं.

मनजीतनं असंही सांगितलं की, जेव्हा पत्नीनं पाहिलं की, मनमीतनं गळफास घेतला आहे. तेव्हा तिला धक्काच बसला. तिनं लोकांकडे मदत मागितली परंतु कोरोनामुळं कोणीच त्याच्या जवळ आलं नाही. जवळपास एक तासानं बिल्डिंगच्या गार्डनं मदत केली आणि मनमीतच्या गळ्याभोवती असलेल्या ओढणीचा फास कापला. यानतंर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.