प्रशांत दामले यांना ‘कोरोना’ची लागण; ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’चे रिओपनिंग रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचे रिओपनिंगचे प्रयोग त्यांनी रद्द केलंय. कारण, अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोना विषाणूची लागण झालीय. त्यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करुन त्यांनी ही माहिती दिलीय. मला डॉक्टरांनी 7 दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळे मी नाटकाचे दोन प्रयोग रद्द केले असून पिंपरीचा प्रयोग करुन आल्यानंतर मला कणकण जाणवली, असे प्रशांत दामले यांनी स्पष्ट केलंय.

प्रशांत दामले म्हणाले की, मागील रविवारी चिंचवडचा प्रयोग झाला तेव्हा मला कणकण वाटत होती. त्यामुळे मी बुधवारी करोनाची तपासणी करुन घेतली. त्यात मी काठावर पास झालोय. तसा काठावर पास मी शाळेपासून आहे. पण, हा काठ जरा डेंजर आहे. त्यामुळे डॉक्टर म्हणाले की, काठावर जरी असलात तरीही 7 दिवसांच्या आयसोलेशनमध्ये तुम्हाला रहावं लागेल. म्हणून मी बुधवारपासून 7 दिवसांच्या आयसोलेशनमध्ये आहे. पण, त्यामुळे झालंय काय की उद्या दुपारचा बोरीवलीचा प्रयोग आणि परवा दुपारचा गडकरी रंगायतनचा प्रयोग हे रद्द करावे लागलेत.

सध्या मी ठणठणीत आहे. पण, डॉक्टर म्हणत आहेत की, तुला 7 दिवस विश्रांती घ्यावी लागेल. सगळ्यात दिलासा देणारी गोष्ट ही आहे की, माझे सगळे सहकलाकार, बॅक स्टेजचे आर्टिस्ट हे ठणठणीत आहेत. मी थोडासा काठावर आहे. काठावरचा मी थोडासा मागे येतो आणि परत काम सुरु करतोय. मी काळजी घेतो तुम्हीही काळजी घ्या, असे म्हणत प्रशांत दामले यांनी व्हिडीओ पोस्ट केलाय.

लॉकडाऊनच्या काळात नाटक, सिनेमा सगळंच बंद होतं. ते लवकर सुरु व्हावं, यासाठी प्रशांत दामले आणि इतर नाट्यकर्मींनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर सरकारची परवानागी मिळाल्यानंतर 12 डिसेंबर रोजी पुण्यात ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग झाला होता.

तसेच चिंचवडलाही एक प्रयोग झाला होता. यानंतर प्रशांत दामले जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांना कणकण जाणवू लागलीय. त्यामुळे त्यांनी बुधवारी कोरोना विषाणू चाचणी केली जी पॉझिटिव्ह आलीय, अशी माहिती प्रशांत दामले यांनी दिलीय.