अभिनेता संजय दत्त ‘रासप’मध्ये प्रवेश करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत वाढत असून रासप वटवृक्ष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे नामदार महादेव जानकर साहेबांची ताकत चौकात नसून शिवाजी पार्कापर्यंत पोहचली असल्याचे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याणमंत्री पंकजाताई मुंडे यांनी केले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचा 16 वा वर्धापनदिन दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर
आज संपन्न झाला. त्यावेळी पंकजाताई मुंडे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार राहुल कुल, प्रवीण दरेकर, बाळासाहेब दोडतले, अभिनेत्री सपना बेदी, चित्रपट निर्माते अजय
अरोरा आदी मान्यवर उपस्थित होते.

नामदार पंकजाताई मुंडे पुढे म्हणाल्या की, रासपची राज्यात ताकत वाढली आहे. रासपचे 98 जिल्हा परिषद सदस्य आहेत. नगरपालिका, बाजार समितीवर रासपचे वर्चस्व आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रासपचा योग्य जागा देऊन सन्मान केला जाईल. आधीच्या सरकारने राज्याला लुटण्याचे काम केले. धनगर समाजाची फसवणूक केली. जाती पातीत तेढ निर्माण करून सत्ता भोगली. त्यांची ही चाल सर्वसामान्य जनतेने 2014 सालीच ओळखली. येणाऱ्या निवडणुकीत देखील सर्वसामान्य जनता
भाजप, शिवसेना, रासप आणि रिपाई (ए) या महायुतीसोबत रहाणार आहे. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, पुण्यश्लोक अहिल्या देवींचे आशीर्वाद घेऊनच राज्यकारभार सुरु आहे. महाराष्ट्रातील जनतेने कोणत्याही जातीपातीला थारा न देता महायुतीला मतदान करावे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या ताकदीची भाजपला जाणीव आहे. रासपचा योग्य जागा देऊन सन्मान केला जाईल.

नामदार महादेव जानकर म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची 15 वर्षे राज्यात सत्ता होती. या पक्षांनी
इतर मागासवर्ग, दलित, आदिवासी आदी समाजावर अन्याय अत्याचार केले. धनगर समाजाच्या आरक्षणाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध असल्याचे नामदार महादेव जानकर यांनी उपस्थित समाज बांधवाना सांगितले. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय समाज पक्ष 27 राज्यात पसरला असून महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि उत्तरप्रदेश या चार राज्यात रासपला पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आमच्या ताकदीचा विचार करून आम्हाला जागा द्या, अशी मागणी नामदार जानकर साहेबांनी पंकजाताई मुंडे याच्याकडे केली. तसेच आमच्या पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढविण्याचे घोषीत केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी महामंडळाचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब दोडतले म्हणाले की, राष्ट्रीय समाज पक्ष हा राज्यातील पाच नंबरचा पक्ष आहे. सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसची अवस्था केविलवाणी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप, शिवसेना नंतरचा तिसरा पक्ष म्हणून उदयास येणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत जीवाचे रान करून पक्षाच्या उमेदवाराचे काम करावे, असे राज्यमंत्री दोडतले यांनी सांगितले. नामदार महादेव जानकर साहेबांच्या माध्यमातून धनगर समाजाच्या आरक्षणाचा 80 टक्के प्रश्न सुटला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महामंडळाला मागताक्षणीच 1000 कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नामदार पंकजाताई मुंडे, नामदार महादेव जानकर यानी केली असल्याचे राज्यमंत्री दोडतले यांनी सांगितले.

अभिनेता संजय दत्त करणार रासपमध्ये प्रवेश
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापन दिनाला अभिनेता संजय दत्त यांनी व्हिडिओ वरून शुभेच्छा दिल्या. तसेच रासपच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

रासपची भाजपकडे 57 जागांची मागणी
राष्ट्रीय समाज पक्षाची राज्यात ताकद वाढली आहे. पक्षाचे 98 जिल्हा परिषद सदस्य आहेत. अनेक नगर पालिका बाजार समित्या रासपच्या ताब्यात आहेत. पक्षाच्या ताकदीचा विचार करूनच भाजपकडे 57 जागांची मागणी केली असल्याचे नामदार महादेव जानकर यांनी उपस्थित जनसमुदायास सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –