भीषण अपघातानंतर अभिनेत्री शबाना आझमींच्या कार चालकाविरोधात ‘FIR’ दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शनिवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीने ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातानंतर जखमी झालेल्या शबाना आझमी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आले. आता शबाना आझमी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी ट्रक चालकाने शबाना आझमींच्या कार ड्रायव्हरविरोधात तक्रार दाखल केली आहे. कारण अपघातात आजमी यांच्या कारसह ट्रकचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

शबाना आझमी यांच्या अपघातानंतर त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी देशभरातून लोक प्रार्थना करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्वीट केलं आहे. ‘शबाना आझमी यांच्या अपघाताचं वृत्त वेदनादायी आहे. त्या लवकर बऱ्या होण्यासाठी मी प्रार्थना करतो,’ असं ट्वीट नरेंद्र मोदींनी केलं.

पुण्याच्या दिशेला जाताना खालापूर टोल नाक्याजवळ शबाना आझमींची कार ट्रकला ओव्हरटेक करत होती. या ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा गंभीर अपघात घडून आला आहे. या अपघातात शबाना आझमींसह त्यांच्या गाडीचा चालक ही जखमी झाला आहे.

दरम्यान शबाना आझमी यांची प्रकृती ठीक होण्यासाठी देशभरातील सगळ्यांनीच प्रार्थना सुरु केल्या आहेत. लता मंगेशकर यांनी देखील ट्वीट केले आहे त्या म्हणाल्या, ‘शबाना आझमी यांचा अपघात झाल्याचं कळाल्यानंतर खूप वाईट वाटलं. त्यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी मी प्रार्थना करते,’ असं ट्वीट गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केलं.

शबाना आझमी कोण आहेत?

शबाना आझमी यांचा जन्म १८ सप्टेंबर १९५० रोजी झाला असून अंकुर या हिंदी चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शबाना आझमी या बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक असून त्यांनी आत्तापर्यंत आपल्या करिअरमध्ये १३० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी अनेक मोठ्या चित्रपटांत काम केले असून जुनून, कंधार, स्पर्श, शतरंज के खिलाडी, सती, अर्थ, पार, गॉडमडर यांसारख्या अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तसेच त्यांनी जॉन श्लेसिंगर यांचा मॅडम सोऊसाटस्का आणि रोनाल्ड जॉफ यांचा सिटी ऑफ जॉय यासारख्या हॉलिवू़ड चित्रपटातही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/