#PulwamaAttack शाहिदच्या ‘त्या’ ट्विटनंतर भडकले युजर्स

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्‍या पुलवामा येथे गुरुवारी(दि- 14) झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सर्व देशातून निषेध होत आहे. इतकेच नाही तर, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची जनतेकडून मागणी केली जात आहे. सर्वसामान्यांसह बॉलिवूडमधूनही याविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना दिसत आहे. अनेक कलाकारांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. पुलवामा हल्‍ल्‍याबाबत अभिनेता शाहिद कपूर ट्‍विट केल्‍याने तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.

पुलवामा दहशतवादी हल्‍ला गुरुवारी १४ फेब्रुवारीला झाला. या घटनेच्‍या एका दिवसानंतर शाहिदने हे ट्‍विट केले आहे. त्‍याचबरोबर, त्‍याने ही घटना मला आता समजली, असे ट्‍विटमध्‍ये लिहिल्‍याने युजर्स संतापले आहेत. आपला संताप व्यक्त करत अनक युजर्सनी त्याला कमेंट द्यायला सुरुवात केली आहे.

शाहिद कपूरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आमच्‍या जवानांवर भ्‍याड हल्‍ला केल्‍याचे आताच ऐकले. त्‍यांच्‍या कुटुंबीयांसाठी माझ्‍या प्रार्थना. मी दु:खी आहे. हे धक्‍कादायक आहे.” शाहिदच्या या ट्विटनंतर नेटकरी भलतेच भडकले आहेत. काहींनी आपल्या कमेंटमधून नाराजी व्यक्त तसेच संतापही व्यक्त केला आहे.

शाहिदच्या ट्विटनंतर युजर्सच्या प्रतिक्रिया :

एका युजरने शाहिदवर टीका करत लिहिले आहे की, ‘डिअर, हे काल घडले आहे, आपण आज ऐकलात…ग्रेट.’ दुसर्‍या एका युजर्सने शाहिदवर निशाणा साधला आहे. त्‍याने म्‍हटले आहे, ‘आपले इंटरनेट इतके स्लो आहे की, आपणास एक दिवसानंतर हल्‍ल्‍याची माहिती मिळाली.’ आणखी एका युजरने लिहिले आहे, ‘जस्ट हियर्ड (आता ऐकले) मंगल ग्रहावर गेला होता का?’ अशा बोचऱ्या शब्दात शाहिदवर नेटकऱ्यांनी टीका केली आहे.