सोनू सूदनं घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट, संजय राऊतांशी ‘सामन्या’नंतर अखेर ‘समेट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सोनू सूद यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रविवारी रात्री मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. या भेटीनंतर दिवसभर सुरु असलेला वादावर समेट झाल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर सोनू सूद यांनी मराठीतून ट्विट केले. स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं आहे. स्थलांतरीत मजूरांसाठी केलेलं कार्य फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नाही. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्याने मला मदतीसाठी बोलावले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येक राज्याच्या सरकारने माज्या या कामात सहकार्य केलं, असे म्हटले आहे.

स्थलांतरीत मजूरांना आपल्या गावी पाठविण्याच्या कामात अभिनेता सूद यांनी हिरीरीने पुढाकार घेतला होता. त्यांच्या या कामाबद्दल सर्वच स्तरातून कौतुकही होत होते. स्वत: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सूद यांना राजभवनावर बोलावून त्यांचे कौतुक केले होते. त्याचवेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सूद यांच्यावर टिका करणारा लेख शिवसेनेचे मुखपत्र सामना मध्ये छापला होता. राऊत यांनी सोनू सूद हा चेहरा आहे. त्यांच्या आडून ठाकरे सरकारवर टिका करण्याचे राजकारण खेळले जात असल्याचा आरोप केला. सोनू सूद हा चांगला अभिनेता आहे. मात्र, त्याच्या या चित्रपटामागे डायरेक्टर दुसरेच कोणी आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला होता. सामनामधील लेखानंतर संजय राऊत यांच्यावर टिका करण्याची संधी अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अमित शहा यांच्यासह सर्वांनी घेतली.

त्यानंतर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सूद यांची बाजू मांडत या विषयावर राजकारण न करण्याचे आवाहन केले. स्वत: सूद यांनी टिष्ट्वट करीत आपली भूमिका मांडली. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा सूद हे मातोश्रीवर पोहचले. त्यांच्यासमवेत अस्लम शेख हेही होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. यावर आदित्य ठाकरे यांनी ‘‘चांगल्या कामासाठी एकत्र काम करण्यासाठी एकत्रितपणे चांगले लोक भेटले. लोकांच्या भल्यासाठी एकत्र येणे केव्हाही चांगलेच़’’ असे टिष्ट्वट केले आहे. यानंतर संजय राऊत यांनी ‘‘अखेर सोनू सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला. मातोश्रीवर पोहोचले, जय महाराष्ट्र,’’असे टिष्ट्वट केले आहे.