Sonu Sood : सोनू सूदने घेतली शरद पवार यांची भेट; उलटसुलट चर्चेला उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सोनू सूदचं निवासस्थान बेकायदा असल्याचं सांगत मुंबई महानगरपालिकेने त्याला नोटीस बजावली आहे. यानंतर आता सोनू सूदने बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आलं आहे. या भेटीबद्दल सविस्तर माहिती समोर आलेली नाही. मात्र ही एक सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, कंगना राणौत आणि मुंबई महानगरपालिका यांच्यात रंगलेल्या वादानंतर आता सोनू सूदविरुद्ध मुंबई महानगरपालिका असा वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

जुहू येथील सहा मजली रहिवासी इमारतीत कोणत्याही परवानगीशिवाय हॉटेल सुरू केल्याचा आरोप करत सोनू सूदवर महाराष्ट्र राज्य शहर नियोजन कायद्याअंतर्गत बेकायदेशीर बदल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंबई महापालिकेने केली होती. त्याविरोधात सोनू सूदनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी १३ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

सोनू सूदने जुहू येथील शक्ती सागर रहिवासी इमारतीचं कोणत्याही परवानगीशिवाय हॉटेलमध्ये रूपांतर केले आहे. या जागेवर बेकायदेशीरपणे बांधकामात बदल करण्यात आला आहे. प्राधिकरणाची परवानगी घेतल्याशिवाय अशाप्रकारे कोणतेही अनधिकृत बदल करता येत नाहीत असे सांगत महापालिकेने चार जानेवारी रोजी जुहू पोलीस ठाण्यात सोनू सूदविरोधात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, सोनू सूदच्या वतीनं वकील डी पी सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम न केल्याचा दावा केला आहे.

पालिकेने ऑक्टोबरमध्ये सोनू सूदला नोटीस पाठवली होती, या नोटिशीविरोधात त्याने स्थानिक न्यायालयात (सिव्हिल कोर्ट) धाव घेतली होती. स्थानिक न्यायालयाने सोनू सूदला उच्च न्यायालयात जाण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली होती. मुंबई उच्च न्यायालायने सूदला १३ जानेवारीपर्यंत कोणत्याही प्रकारे जबरदस्तीने होणाऱ्या कारवाईविरोधात संरक्षण दिले आहे.