चक्रीवादळात कोलमडलेल्या कोकणला सुबोध भावेकडून मोलाची मदत

पोलिसनामा ऑनलाईन – ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा मोठा फटका कोकण परिसराला बसला आहे. लाखांच्या घरात झाडे जमीनदोस्त झाली असून आर्थिक नुकसान शेकडो कोटींचे आहे. घरे- बागांचेच नाही तर बोटी आणि मच्छिमारांचेही अतोनात नुकसान झाले. काही सेलिब्रिटीसुद्धा कोकणाच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अभिनेता सुबोध भावे यानेसुद्धा कोकणासाठी मोलाची मदत केली आहे.

सुबोध व त्याच्या टीमने मिळून चक्रीवादळाने नुकसान झालेल्या 400 कुटुंबीयांना फॅमिली किट पोहोचवलं आहे. त्याचा फोटो सुबोधने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याचसोबत लोकांनाही मदत करण्याचे आवाहन त्याने केले आहे. ‘कोकणातील चक्रीवादळाने नुकसान झालेल्या 400 कटुंबियांपर्यंत पाठवलेले फॅमिली किट पोहोचले आहे. तुम्ही लवकरात लवकर या संकटातून बाहेर यावं हीच प्रार्थना’, असे ट्विट त्याने केले आहे.

कोकण परिसरातील आंबा, नारळ, सुपारी आणि काजू बागा वादळामुळे उध्वस्त झाल्या आहेत. शेकडो फळ झाडे उन्मळून पडल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. हे नुकसान कसे भरून काढयचे, याच विवंचनेत ते अडकले आहेत. अनेक कलाकारांनी पुढाकार घेत चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना मदत केली आहे. 3 जूनला निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्याच्या किनार्‍यावर धडकले होते. तीन तास वादळ किनारपट्टीवरील भागात सक्रीय होते. गावच्या गाव या वादळाच्या कचाट्यात सापडली होती. निसर्गाच्या या प्रकोपापुढे सगळेच जण हतबल ठरले होते.