काँग्रेसकडून लोकसभा लढवणाऱ्या उर्मिलाची संपत्ती किती ? शिक्षण मात्र अवघे …

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबई मतदार संघातून काँग्रेस पक्षातून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. उर्मिलाने काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून वारंवार ती लोकांमध्ये वावरताना दिसत आहे. नुकतेच गुढीपाडवा निमित्त झालेल्या रॅलीमध्ये देखील उर्मिला मातोंडकर लेझीम खेळताना दिसली होती. उर्मिलाने काल सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रात उर्मिलाने तिची जंगम मालमत्ता ४१ कोटी रुपयांची असल्याचे नमूद केले आहे.

उर्मिलाची संपत्ती

उर्मिलाने काल वांद्रे येथील कलेक्टर ऑफिसमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी तिने आपली संपत्ती, शिक्षण, गुन्हेविषयक माहिती जाहीर केली आहे. उर्मिलाची जंगम मालमत्ता ४१ कोटी रुपयांची आहे. यात शेअर्स, बॉण्ड, म्युचुअल फंड (२८.२८ कोटी) यांचा समावेश आहे शिवाय तिच्याकडे एक मर्सिडीज कार असल्याचे तिने नमूद केले आहे.

तिच्या स्थावर मालमत्तेत वांद्रे येथील चार फ्लॅट्सचा समावेश होतो. सध्याच्या बाजारभावानुसार या फ्लॅट्सची किंमत २७. ३४ कोटी रुपये होते. ठाणे जिल्ह्यातल्या वसईमध्ये उर्मिला मातोंडकरांच्या नावे दहा एकर जमीन आहे. याची किंमत सध्याच्या दरानुसार एक कोटी ६८ लाख रुपयांच्या आसपास आहे.

उर्मिलाचे शिक्षण

उर्मिलाने मुंबईतील प्रसिद्ध डी. जी रुपारेल महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. मात्र द्वितीय वर्षानंतर म्हणजेच (SYBA) नंतर तिने शिक्षण सोडून दिले. मात्र उर्मिलाच्या विरोधात कोणताच गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

सोमवारी उर्मिलाने तिचे पती मीर यांच्यासोबत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हे दोघेजण बाईकवरून वांद्र्यात आले होते. उर्मिलाचे पती मोहसीन यांच्या नावे ३५ लाख रुपये फिक्स डिपॉजिट आहे. तर दुसऱ्या खात्यात पाच लाख रुपये असून १५ हजारांची रोकड आहे.