शिवसेनेचा मोठा डाव ! अभिनेत्री दिपाली सय्यद शिवसेनेत ; आव्हाडांना देणार आव्हान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सामाजिक- राजकीय कार्यात सक्रिय असणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी अनपेक्षितपणे शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांना विधानसभेसाठी मुंब्रा-कळवा मतदारसंघात उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. त्यामुळे त्यांची लढत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि सध्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात होणार आहे. शिवसेनेचा ऐनवेळी घेतलेला हा निर्णय सर्वानाच अनपेक्षित होता.

आज रात्री उशिरा मातोश्री निवासस्थानी दीपाली सय्यद यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय आणि घोषणा तात्काळ करण्यात आली. त्या उद्या (४ सप्टेंबर) आपला उमेदवारी अर्ज सादर करतील. गेल्या विधानसभा निवडणुकीत आव्हाड यांनी मोठ्या मताधिक्क्याने याठिकाणी विजय मिळवला होता. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार दशरथ पाटील हे होते. यावेळी मात्र या मतदारसंघातील मुस्लिम मतदारांची मोठी संख्या लक्षात घेऊन शिवसेनेने दीपाली सय्यद यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यांच्या सेलिब्रिटी म्हणून असलेल्या ओळखीचा फायदाही पक्षाला होईल. त्यामुळे त्या आव्हाड यांना कडवी लढत देतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

आम आदमी पक्षाने नगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर दिपाली सय्यद यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. दिपाली सय्यद नंतर शिवसंग्राम पक्षात गेल्या होत्या.दीपाली सय्यद यांनी नगर जिल्ह्यातील साकळाई पाणी योजनेसाठी केलेले आंदोलन चर्चेत राहिले आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळाला होता.

isit : Policenama.com