‘वेस्टर्न’ टॉयलेटमधील अस्वच्छता पाहून पुरुषांवर संतापली अभिनेत्री !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सार्वजनिक ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहांमध्ये वेस्टर्न टॉयलेट वापरताना अनेकांकडून स्वच्छता ठेवली जात नाही. त्यामुळेच अभिनेत्री हेमांगी कवी हिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. पाश्चात्य पद्धतीच्या शौचालयाचा योग्य पद्धतीने वापर न करणार्‍यावर तिने टिकास्त्र सोडले आहे.

शौचालये अस्वच्छ ठेवली तर त्यामुळे महिलांना किती समस्यांचा सामना करावा लागतो हे तिने तिच्या पोस्टमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.अनेक कामाची ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट असतात. त्यातच बर्‍याचदा स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी एकच टॉयलेट असते. त्यामुळे बर्‍याच वेळा स्त्रियांची अडचण येते. कारण बरेच पुरूष या पाश्चात्य शौचालयाचा योग्य वापर करत नसल्यामुळे स्त्रियांना अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा महिलांना मासिक पाळीत या गोष्टीचा सर्वाधिक त्रास होतो. त्यामुळे पाश्चात्य शौचालय कसे वापरावे याचे ज्ञान मुलांना लहान असतानाच शाळेत किंवा घरात दिले पाहिजे, असे हेमांगी म्हणाली. पुरुष मूत्र विसर्जन करताना कमोडवर, आजूबाजूला जी काही रांगोळी करून ठेवतात ते बघूनच अंगावर शिसारी येते. स्त्रियांची मूत्र विसर्जन करायची पद्धत या पुरुषांना माहीत नसते का? की याचा विचारच केला जात नाही? की अश्या घाणेरड्या कमोडवर त्या कशा बसत असतील?असा सवाल केला आहे. या पोस्टमध्ये हेमांगीने अनेक गोष्टींवर थेट भाष्य केले आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट चांगलची चर्चिली जात आहे. कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी तिला पाठिंबा दिला आहे.