अभिनेत्री केतकी चितळेनं केला शेअर स्क्रीनशॉट, नेत्यानं धमकी दिल्याचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल स्टँड-अप कॉमेडियनने केलेल्या विनोदामुळे तरुणांमध्ये सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर केतकी चितळे हिने या तरुणांवर आक्रमक टीका केली. त्यामुळे तिला ट्रोलही करण्यात आलं. त्यातच आता केतकी चितळेनी आणखी एक पोस्ट लिहून शिवसेनेच्या एका विभागप्रमुखाने धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

केतकी चितळे हिने यासंदर्भातील मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत म्हटलं आहे की, ‘शिवसेना अध्यक्ष प्रमुख आणि तरीही पोस्ट कळली नाही. हे आहेत नेते, ज्यांना मराठी कळत नाही. कळत काय तर लोकांचे पर्सनल नंबर घेऊन, त्यांच्यावर खोटे आरोप करुन, त्यांना धमक्या देणे.’

तसेच ‘महाराजांच्या नावाचा उल्लेख एकेरी करता तुम्ही आणि हसता…महाराष्ट्रात राहून त्यांच्या जीवावर नाव कमावले तुम्ही आणि एकेरी उल्लेख… मी शिवसेनेचा विभागप्रमुख आहे… पुन्हा खोटारडे लोक असा शब्द केला ना… मग बघ,’ असं त्या मेसेजमध्ये लिहल्याच केतकी चितळेने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे.

केतकी चितळे सोशल मीडियावर ट्रोल, नक्की काय होती फेसबुक पोस्ट?

यापूर्वी केतकीने सोशल मीडियावर राग व्यक्त करत फेसबुकवर एका पोस्ट लिहली होती. त्यात ती म्हणते की, ‘३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारुन, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरु करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा.’ असं तिने म्हटलं होत.