पुणे : खंडणी प्रकरणी अभिनेत्री सारा श्रवण हिला मुंबईतून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –‘रोल नंबर १८’ या चित्रपटातील अभिनेत्याविरुद्ध कटकारस्थान करून विनयभंगाची खोटी तक्रार देवून ती मागे घेण्यासाठी खंडणी उकळल्या प्रकरणी अभिनेत्री सारा श्रवण ऊर्फ सारा गणेश सोनवणे (वय ३२, रा. मुंबई) हिला गुन्हे शाखा यूनिट दोनने रात्री मुंबईमधून अटक केली आहे. तिला रविवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

खंडणीचा हा गुन्हा गंभीर असल्यामुळे तिने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. अटकपूर्व जामीन अर्जाला फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. मिलिंद पवार आणि अ‍ॅड. अजय ताकवणे यांनी विरोध केला होता.

याप्रकरणी अभिनेता सुभाष दत्तात्रय यादव (रा. गुलमोहर सोसायटी, शास्त्री रोड, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात रोल नंबर १८ चित्रपटाची अभिनेत्री रोहिणी मच्छिंद्र माने (रा. दहीटना, नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), दहशतवाद विरोधी पथकातील पोलिस उपनिरीक्षक अमोल विष्णू टेकाळे (रा. स्वारगेट पोलिस लाइन) आणि सराईत गुन्हेगार राम भरत जगदाळे (रा. पर्वती पायथा, सहकारनगर) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. तेव्हापासून सारा श्रवण दुबईमध्ये पळून गेली होती. अभिनेत्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून त्याच्याकडून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी उपनिरीक्षक अमोल टेकाळे याला निलंबित करण्यात आले आहे.

हा प्रकार २८ सप्टेंबर २०१८ रोजी जगदाळे यांच्या सहकारनगर येथील कार्यालयात घडला होता. रोहिणी माने व यादव यांनी ‘रोल नंबर अठरा’ या चित्रपटात काम केले आहे. यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर यादवला मिळत असलेली प्रसिद्धी माने आणि श्रवणला पाहवत नव्हती. तसेच माने ही आपल्याशी लग्न कर यासाठी यादव यांच्या मागे लागली होती. नंतर वानवडी पोलिस ठाण्यात सर्व आरोपींनी संगनमताने यादव विरुद्ध वानवडी पोलिस ठाण्याच्या वॉशरूम मध्ये घुसून मानेची छेड काढली असा आरोप करून विनयभंगाची तक्रार दाखल केली होती.

हे सर्व कटकारस्थान असल्याची तक्रार यादवने पुणे पोलिस आयुक्तांकडे केली. याची माहिती मिळताच हा गुन्हा मिटविण्यासाठी माने, टेकाळे व जगदाळे यांनी यादव यांना जगदाळेच्या कार्यालयात बोलावून घेतले. व दाखल गुन्हा मागे घ्यायचा असल्यास सुभाषने माने हिच्या पाया पडून माफी मागावी व आम्ही त्याचे चित्रीकरण करू अशी अट घातली. मात्र सुभाषने या गोष्टीसाठी नकार दिला. विनयभंगाचा गुन्हा खोटा असल्यामुळे माफी मागणार नाही असे सांगितले मात्र त्यानंतर 3 तास सर्वानी जीवे मारण्याची व खोटे गुन्हे दाखल करु अशा धमक्या देवून तेथे त्याला व त्याच्या नातेवाइकांना रोहिणी माने हिचे जबरदस्तीने पाय धरून माफी मागण्यास भाग पाडले. त्याचे चित्रीकरण करून १५ लाख रुपयांची मागणी केली. व पैसे न दिल्यास माफी मागतानाचा व्हिडिओ व्हायरल करू व विनयभंगाचा गुन्हा देखील मागे घेणार नाही अशी धमकी दिली. त्यापैकी १ लाख रुपये त्यांनी स्वीकारले.

त्यानंतर होणाऱ्या  ब्लॅकमेलिंगला कंटाळून यादव याने उर्वरित रक्कम न देण्याचा निर्णय घेतला. उरलेली रक्कम न दिल्याने जगदाळे, टेकाळे व रोहिणी यांनी संगनमत करून सारा श्रवण हिच्यामार्फत पाय धरून माफी मागतानाचा व्हिडिओ व अनेक खोट्या अफवा सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी केली. सारा आणि माने या दोघी मैत्रिणी आहेत. सारा दुबईत वास्तव्यास असल्याने तिला अटक करता आली नव्हती. भारतात आल्यावर तिने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर  तिला अटक करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक जयवंत जाधव पुढील तपास करत आहेत.

Visit : Policenama.com